ट्रम्प यांची वाकडी चाल, विकसनशील यादीतून हिंदुस्थानला वगळले

1145
trump

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प येत्या 24 फेब्रुवारीला हिंदुस्थानच्या बहुचर्चित भेटीवर येत आहेत. या दौर्‍याआधी बोलताना त्यांनी अमेरिका आणि हिंदुस्थान यांची मैत्री अधिक वृद्धिंगत होईल असे सांगत व्यापारातही सकारात्मक करारांचे संकेत दिले होते. पण अमेरिकेच्या व्यापार प्रतिनिधी समितीने हिंदुस्थानला विकसनशील देशांच्या यादीतून बाहेर काढत ट्रम्प यांच्या हिंदुस्थान भेटीआधीच मोठा झटका दिला आहे. त्यामुळे अमेरिकन करांतून निर्यातीसाठी सूट मिळण्याचे हिंदुस्थानचे दरवाजे बंद झाले आहेत. अमेरिकेच्या मतानुसार हिंदुस्थान आता विकसित देशाच्या यादीत मोडतो.

अमेरिकेने याआधीही हिंदुस्थानच्या उत्पादनांवरील सबसिडीला विरोध दर्शवला होता. अमेरिकन उद्योजकांच्या मते हिंदुस्थानातील सबसिडी हा प्रकार उत्पादकांना घाट्यात टाकणारा आहे. शिवाय अमेरिकेतून येणार्‍या अनेक वस्तूंवर लावलेले कर हिंदुस्थानने कमी करावेत आणि अमेरिकन कंपन्यांना हिंदुस्थानी कंपन्यांच्या बरोबरीने लाभ द्यावा अशी ट्रम्प प्रशासनाची आग्रही मागणी आहे. या साऱया आडकाठींमुळे अमेरिकेने जर्नलाइज्ड सिस्टिम ऑफ प्रिफरन्स (जीएसपी) देशांच्या यादीत स्थान मिळवण्याचा हिंदुस्थानचा मार्गच बंद केला आहे.

अमेरिका काय म्हणते

आम्ही जगातील विकसनशील देशांना व्यापारातून मोठा लाभ मिळावा आणि या क्षेत्रात त्यांचा विकास व्हावा या उद्देशाने आम्ही त्यांना जीएसपीचा लाभ देतो. आता हिंदुस्थानने जागतिक व्यापारात 0.5 टक्क्यांपेक्षा अधिक मजल मारली आहे. त्यामुळे हिंदुस्थान आता विकसित देशांच्या गटात मोडतो. मग त्यांना ही सवलत कशाला, असे अमेरिकन प्रशासनाचे म्हणणे आहे.

हिंदुस्थानच्या या उद्योगांना बसणार मोठा फटका

अमेरिकेने सरकारी सबसिडीचे तुमाने लावून हिंदुस्थानातील काही उत्पादनांवर निर्यातबंदी लादली तर खते, कृषी उत्पादने क्षेत्राला मोठा आर्थिक फटका बसेल. शिवाय अमेरिकेने जीएसपी सवलत रद्द केल्यामुळे दागिने, चामड्याच्या वस्तू,  औषधे, रसायने आणि कृषी उत्पादनांच्या अमेरिकेला होणार्‍या निर्यातीवर विपरीत परिणाम होणार आहेत. मालाचे निर्यातमूल्य प्रचंड वाढल्यामुळे या क्षेत्रातील हिंदुस्थानी उद्योजकांचे कंबरडे मोडेल अशी भीती व्यक्त होत आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या