हिंदुस्थानी दूतावासातील दोन कर्मचारी मायदेशी परतले; खोट्या हिट अँड रन प्रकरणात गुंतवून कोठडीत छळ

705

पाकिस्तानातील हिंदुस्थानी दूतावासाच्या दोन कर्मचाऱ्यांवर हिट अँड रनच्या खोटय़ा केसेस टाकून त्यांचा कोठडीत 10 तास जबर छळ करण्यात आला. हिंदुस्थानने याप्रकरणी तीव्र नाराजी व्यक्त करताच पाकने या दोन कर्मचाऱ्यांची सुटका केली. सोमवारी अटारी सीमेवरून हे दोन कर्मचारी मायदेशी परतले. दूतावासात वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या या सीआयएसएफ जवानांची नावे सेल्वादास पॉल आणि द्विमू ब्रह्म अशी आहेत. या कर्मचाऱ्यांच्या शरीरावर खोल जखमांचे घावही आहेत. पाकिस्तानी दूतावासातील दोन अधिकाऱ्यांना नवी दिल्लीत हेरगिरीप्रकरणी रंगेहाथ पकडले होते. त्याचाच सूड म्हणून पाकड्यांनी हिंदुस्थानी दूतावास कर्मचाऱ्यांचा छळ केल्याचे उघड झाले आहे.

हिंदुस्थानद्वेषाने पेटलेल्या पाकिस्तानच्या कुरापतखोर वागणुकीत तसूभरही बदल झालेला नाही. नवी दिल्लीतील आपल्या दूतावास अधिकाऱ्यांवरही हेरगिरीचे आरोप स्पष्ट झाल्यावर पाकिस्तान बिथरला आहे. त्याचाच सूड म्हणून त्यांनी पाकिस्तानातील हिंदुस्थानी दूतावासात वाहनचालक म्हणून काम करणाऱ्या सेल्वादास पॉल आणि द्विमू ब्रह्म यांचा पाठलाग केला. पाक पोलिसांनी या दोघांवर वेगाने वाहन चालवून अपघात केल्याचे खोटे गुन्हे दाखल केले.त्यानंतर त्या दोन्ही कर्मचाऱ्यांना 10 तास कोठडीत डांबून चौकशीच्या बहाण्याने त्यांना जबर मारहाण केली. हा प्रकार कळताच हिंदुस्थानी परराष्ट्र मंत्रालयाने आपली तीव्र नाराजी व्यक्त करत दूतावास कर्मचाऱ्यांची सुटका करण्याची मागणी केली. त्यानंतर पाकिस्तानने या दोघांची सुटका केली.

10 तास गुन्हेगारांसारखी मारहाण
पाकिस्तानी पोलिसांनी हिंदुस्थानी दूतावास कर्मचारी पॉल आणि ब्रह्म यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून इस्लामाबादच्या पेट्रोल पंपावर ताब्यात घेत डोळय़ावर पट्टी बांधून अज्ञात स्थळी नेले. तिथे त्यांना लाठी, दांडे आणि मुक्क्यांनी 10 तास मारहाण करण्यात आली. कार ऑक्सिडेंटचा गुन्हा कबूल करा, अशी बळजबरी या दोघांवर करण्यात येत होती. अखेर हिंदुस्थानच्या दबावानंतर त्याच दिवशी सायंकाळी या कर्मचाऱ्यांना छळछावणीतून मुक्त करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या