पाकड्यांची टरकली; मदतीसाठी संयुक्त राष्ट्रांसमोर रडारड

1286

केंद्र सरकारने जम्मू कश्मीरमधून कलम 370 रद्द केल्यानंतर पाकिस्तान पुरता भांबावून गेला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदुस्थानविरोधात कांगावा करण्याचाही त्यांना काही फायदा झाला नाही. त्यामुळे पाकिस्तानने आता पुन्हा एकदा संभाव्य युद्धाचा कांगावा करत संयुक्त राष्ट्रांकडे मदतीची मागणी केली आहे. तसेच पुन्हा एकदा कश्मीरचा मुद्दा आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित करण्याचा प्रयत्न केला आहे. हिंदुस्थानने केलेल्या सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईकमुळे पाकिस्तानची टरकली असून त्यांना युद्धाची भीती सतावत आहे. त्यामुळे त्यांनी आता संयुक्त राष्ट्रांकडे धाव घेतली आहे.

हिंदुस्थान पाकिस्तानविरोधात विनाशकारी युद्ध करण्याच्या प्रयत्नात असल्याचा कांगावा आता पाकिस्तानने सुरू केला आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने आणि संयुक्त राष्ट्रांचे महासचिव अँटानिओ गुटेरस यांनी दोन्ही देशातील संभाव्य युद्ध टाळण्यासाठी निर्णायक पावले उचलावीत अशी मागणी पाकिस्तानने केली आहे. हिंदुस्थान आणि पाकिस्तानात तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे दोन्ही राष्ट्रांतील संभाव्य युद्ध टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी निर्णायक पावले उचलावीत असे पाकिस्तानचे राजदूत मुनीर अकरम यांनी म्हटले आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषेदेत खुल्या परिसंवादात ते बोलत होते. यावेळी पाकिस्तानने पुन्हा कश्मीरचा मुद्दा उपस्थित करून कश्मीरमध्ये मानवाधिरांचे उल्लंघन होत असल्याचा कांगावा केला आहे. कश्मीरी नागरिकांना त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

कश्मीरचा मुद्दा उपस्थित करत पाकिस्तानने हिंदुस्थानविरोधात बिनबुडाचे आरोप करत कांगावा केला आहे. कश्मीरमध्ये दीडशे दिवसांपासून कर्फ्यू आहे. अनेक कश्मीरी नेते तुरुंगात आहेत. हजारो कश्मीरी युवकांवर अत्याचार होत आहेत, असे पाकिस्तानचे म्हणणे आहे. पाकिस्तानी प्रतिनिधीमंडळ, पत्रकार आणि पर्यवेक्षकांच्या अहवालावर आधारित एक डोजिअरही पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांसमोर सादर केले आहे. त्यात कश्मीरमध्ये भीती आणि दहशत आहे, असे नमूद केले आहे. पाकिस्तानविरोधात हिंदुस्थान आक्रमक आणि चिथावणीखोर भूमिका घेत आहे. त्यामुळे हिंदुस्थान पाकिस्तानविरोधात युद्ध करण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येत आहे, असा आरोपही पाकिस्तानने केला आहे. हिंदुस्थानने प्रकाशित केलेल्या नकाशालाही अकरम यांनी विरोध केला आहे. त्यात पाकव्याप्त कश्मीर आणि गिलगिट बाल्टीस्तान हिंदुस्थानचा भाग असल्याचे दाखवले आहे. हिंदुस्थानचे गृहमंत्री आणि परराष्ट्रमंत्री आक्रमक वक्तव्ये करत असून पाकिस्तानच्या भागावर ताबा मिळवण्यासाठी हिंदुस्थान पाकिस्तानशी युद्ध करू शकतो. असे युद्ध झाल्यास जगासाठी ते विनाशकारी ठरणार आहे. त्यामुळे संयुक्त राष्ट्रांनी संभाव्य युद्ध टाळण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही पाकिस्तानने म्हटले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या