जम्मू-कश्मीरच्या अवंतीपोरा येथे 3 दहशतवादी ठार; 48 तासांत दुसरी मोठी चकमक

जम्मू-कश्मीरच्या अवंतीपोरा येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले आहेत. पोलीस आणि सैन्याने संयुक्त कारवाई सुरू केल्यानंतर आज सकाळी सुरू झालेल्या भीषण गोळीबारात हे दहशतवादी ठार झाले आहेत. दक्षिण कश्मीरमधील पुलवामाच्या उपजिल्हा असलेल्या अवंतीपोरा येथील नादेर आणि त्राल भागात ही चकमक सुरू झाली. 48 तासांत ही दुसरी चकमक आहे.

हे तीन दहशतवादी एका घरात लपले होते आणि याची माहिती मिळताच जवानांनी या घराला घेराव घातला. दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू करताच जवानांनी प्रत्युत्तर दिले.

मंगळवारी (13 मे) जम्मू-कश्मीरच्या शोपियान येथे सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. गुप्तचरांनी दिलेल्या माहितीनंतर सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांना रोखले.

हिंदुस्थानी लष्कराने X वर पोस्ट केले की, ’13 मे 2025 रोजी, राष्ट्रीय रायफल्स युनिटच्या विशिष्ट गुप्त माहितीच्या आधारे, शोपियानच्या शोकल केलर भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाली होती. हिंदुस्थानी लष्कराने शोध मोहीम सुरू केली. या मोहीमे दरम्यान, दहशतवाद्यांनी जोरदार गोळीबार केला आणि भीषण गोळीबार झाला, ज्यामुळे तीन कट्टर दहशतवादी ठार झाले. शोध मोहीम सुरू आहे’.

जम्मू आणि कश्मीरमध्ये नियमितपणे अनेक मोहीमा राबवल्या जात आहेत, विशेषतः 22 एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर, ज्यामध्ये 26 लोक मारले गेले होते. या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, हिंदुस्थानने 7 मे रोजी ऑपरेशन सिंदूर सुरू केले, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त कश्मीर (PoK) मधील नऊ दहशतवादी तळांना लक्ष्य केले गेले. या मोहिमेने दोन्ही देशांमधील तणाव वाढला, ज्यामुळे हल्ले आणि प्रतिहल्ले झाले.