देशात कोरोनामुळे 24 तासांत 6 मृत्यू, अहमदाबादेत 18 वर्षांच्या गर्भवतीने गमावला प्राण

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून गेल्या 24 तासांत 6 जणांचा मृत्यू झाला. यात अहमदाबादेत 18 वर्षांच्या गर्भवतीचा समावेश आहे. देशभरात आतापर्यंत कोरोनामुळे 34 जणांचा मृत्यू झाला आहे. सक्रिय रुग्णांची संख्या 3 हजार 796 वर पोहोचली असून केरळात सर्वात जास्त म्हणजे 1 हजार 435 रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, 10 दिवसांत कोरोनाच्या रुग्णसंख्येत 15 पटींनी वाढ झाली आहे.

कोरोनाच्या नव्या चार व्हेरिएंटचा हिंदुस्थानात प्रसार होत असून हा विषाणू धोकादायक नसल्याचा दावा केंद्रीय आरोग्य खात्याकडून केला जात आहे. मात्र, असे असूनही जानेवारीपासून आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या 34 वर पोहोचली आहे तर गेल्या 24 तासांत 6 मृत्यू झाले आहेत. सोमवारी अहमदाबादमध्ये 18 वर्षीय गर्भवती मुलगी आणि 47 वर्षांच्या महिलेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. रविवारी दिल्लीत 22 वर्षीय मुलगी आणि तामीळनाडूमध्ये 25 वर्षीय मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला.

अशी घ्या काळजी

ताप, खोकला, छातीत दुखणे किंवा श्वास घेण्यास त्रास होत असल्यास त्या व्यक्तीने कोरोना चाचणी करावी. कोरोना पॉझिटिव्ह असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे योग्य तो औषधोपचार करावेत, योग्य ती विश्रांती घ्यावी, असे आवाहन केंद्रीय आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

मुंबईत सर्वाधिक रुग्ण, राज्यभरात 10 जणांचा मृत्यू

कोरोनाचे केरळमध्ये सर्वाधिक 1 हजार 435 रुग्ण सापडले आहेत. सक्रिय रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱया क्रमांकावर आहे. येथे 506 रुग्ण आहेत तर आतापर्यंत मुंबईत तीन जणांचा तर महाराष्ट्रात एकूण सात जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, राज्यात आज 59 रुग्ण सापडले. त्यात आतापर्यंत मुंबईत सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. मुंबईत आज 22, ठाणे 1, पुणे-18, पिंपरी-चिंचवड-2, सातारा-2, कोल्हापूर-2, सांगली-1, संभाजीनगर – 8 रुग्ण सापडले आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 12 हजार 11 चाचण्या झाल्या असून 873 रुग्ण सापडले आहेत. दरम्यान, राज्यभरात आतापर्यंत एकूण 10 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.