देशामध्ये यंदाचा उन्हाळा चांगलाच चटके देणारा ठरला आहे. या उन्हाळ्यात 40,000 हून अधिक संशयित उष्माघाताची प्रकरणे नोंदवली गेली आहेत. प्रदीर्घ उष्णतेच्या लाटेने देशभरात 100 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर त्याच्या ईशान्येकडील काही भाग मुसळधार पावसामुळे आलेल्या पुराने ग्रासला आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
संपूर्ण आशियातील अब्जावधी लोक या उन्हाळ्यात तीव्र उष्णतेशी झुंजत आहेत, शास्त्रज्ञ म्हणतात की वाढत्या मानवी हस्तक्षेपामुळे हवामान बदलाची परिस्थिती आणखी बिघडली आहे, उत्तरकडील तापमान जवळजवळ 50 अंश सेल्सिअस (122 अंश फॅरेनहाइट) पर्यंत वाढले आहे.
अत्याधिक उष्णतेमुळे पक्षी आकाशातून पडताना पाहायला मिळाले आणि मार्चमध्ये उन्हाळा सुरू झाल्यापासून अलिकडच्या आठवड्यात दिवसा आणि रात्रीच्या दोन्ही वेळेच्या तापमानाने उच्चांक गाठल्यामुळे रुग्णालयांमध्ये उष्णतेचा फटका बसलेल्या रुग्णांची वाढ नोंदवली आहे.
आरोग्य मंत्रालयाने केंद्रीय आणि राज्य आरोग्य संस्थांना रूग्णांकडे ‘तात्काळ लक्ष’ देण्याचे आदेश दिले, तर राजधानी दिल्लीतील रुग्णालयांना अधिक बेड उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की 40,000 हून अधिक संशयित उष्माघाताची प्रकरणे आहेत आणि 1 मार्च ते 18 जून दरम्यान किमान 110 मृत्यूची पुष्टी झाली आहे, जेव्हा वायव्य आणि पूर्व हिंदुस्थानात उष्णतेच्या लाटेच्या दिवसांपेक्षा दुप्पट नोंद झाली होती.
हवामान विभागाने या महिन्यातही सामान्य तापमानापेक्षा जास्त तापमानाचा अंदाज वर्तवला आहे, कारण अधिकारी म्हणतात की असंतुलित वाढीमुळे देशातील शहरे ‘उष्णतेचे सापळे’ बनली आहेत.
‘सध्या सुरू असलेल्या उष्णतेच्या लाटेत, आम्हाला प्राप्त होणारे बहुतेक पक्षी वाचवण्याचे कॉल हे आकाशातून पडणाऱ्या पक्ष्यांमुळे आहेत’, अशी माहिती ना-नफा वन्यजीव SOS चे सह-संस्थापक आणि CEO कार्तिक सत्यनारायण यांनी दिली.
‘गेल्या दोन आठवड्यांत, वाइल्डलाइफ एसओएसला दिल्ली-राष्ट्रीय राजधानी प्रदेशात आणि आसपास दररोज 35-40 पेक्षा जास्त रेस्क्यू कॉल्स येत आहेत. बहुतेक कॉल्समध्ये पक्षी बचावाच्या विनंत्यांचा समावेश आहे’, असं ते म्हणाले.
तर ईशान्येकडील राज्य आसाममध्ये संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूर आणि भूस्खलनात मंगळवारी रात्री किमान सहा जणांचा मृत्यू झाला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.
‘भूस्खलनात एक महिला आणि तिच्या तीन मुली जिवंत गाडल्या गेल्या’, असे राज्य आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सिजू दास यांनी सांगितले.
‘त्यांचे घर उतारावर होते आणि मध्यरात्रीच्या सुमारास त्यांचा जागीच मृत्यू झाला’, अशी माहिती त्यांनी दिली. ते म्हणाले, बचावकर्त्यांनी तीन तासांच्या शोध मोहिमेनंतर मृतदेह बाहेर काढले. ‘या घटनेत तीन वर्षांच्या मुलाचाही मृत्यू झाला’.
आसाममध्ये, 1,60,000 हून अधिक लोक प्रभावित झाले असून देशातील सर्वात मोठ्या नद्यांपैकी एक असलेल्या ब्रह्मपुत्रेच्या सर्वात मोठ्या उपनद्यांपैकी एक असलेल्या कोपिलीमध्ये पाण्याने धोक्याची पातळी ओलांडली आहे.
अतिवृष्टीमुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात मे महिन्याच्या अखेरीपासून राज्यात 30 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.