आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका; हिंदुस्थानने तुर्कस्थानच्या राष्ट्रपतींना सुनावले

1051

तुर्कस्थानचे राष्ट्रपती रिसेप तय्यीप एर्दोगान यांनी कश्मीरसंदर्भात केलेल्या विधानावरुन हिंदुस्थानने त्यांना खडे बोल सुनावले आहेत. हिंदुस्थानच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नका, असे त्यांना बजावण्यात आले आहे. एर्दोगान यांनी शुक्रवारी कश्मीरचा मुद्दा उपस्थित केला. पाकिस्तानएवढाच कश्मीर आम्हालाही प्रिय आहे. कश्मीरच्या मुद्द्यावर तुर्कस्तानचा पाकिस्तानला पाठिंबा असून कश्मीरमध्ये सध्या जे काही सुरू आहे ते अमानवीय असल्याची गरळ त्यांनी ओकली. तसेच काश्मीरच्या विषयावर पाकिस्तानच्या भूमिकेचे पूर्ण समर्थन करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. पाकिस्तानी संसदेच्या संयुक्त सत्राला संबोधित करताना त्यांनी काश्मीरबाबत विधान केले. फायनान्शिअल टास्क फोर्सच्या ग्रे लिस्टमधून बाहेर पडण्यासाठी पाकिस्तानला साथ देणार असल्याचीही त्यांनी घोषणा केली. दहशतवादाला प्रोत्साहन देणाऱ्या देशांना ग्रे लिस्टमध्ये टाकण्यात येते.

जम्मू-काश्मीर हिंदुस्थानचा अविभाज्य भाग असून, ही आमची अंतर्गत बाब आहे. एर्दोगान यांची काश्मीर संदर्भातील सर्व विधाने आम्ही फेटाळून लावतो. तुर्कस्थानने आमच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करु नये. कश्मीरबाबतचे सत्य समजून घ्यावे. पाकिस्तानपुरस्कृत दहशतवादामुळे जगभरासह हिंदुस्थान आणि प्रादेशिक शांततेला धोका आहे, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी म्हटले आहे. पुलवामा दहशतवादी हल्ल्याची वर्षपूर्ती होत असतानाच, एर्दोगान यांनी कश्मीर मुद्द्यावरून गरळ ओकली आहे. त्याची दखल घेत हिंदुस्थानने तुर्कस्थानला खडे बोल सुनावले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या