श्रीहरी, माना यांना ऑलिम्पिकसाठी नामांकन

हिंदुस्थानी जलतरण संघाने (एसएफआय) श्रीहरी नटराज व माना पटेल यांना युनिव्हर्सलिटी प्लेस क्वॉलिफिकेशन सिस्टीम या कोटय़ातून टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी नामांकित केले आहे. एखाद्या देशाचा जलतरणपटू ऑलिम्पिकची पात्रता मिळविण्यात अपयशी ठरला असेल तर तो देश युनिव्हर्सलिटी कोटय़ातून आपल्या दोन सर्वोच्च क्रमवारीच्या जलतरणपटूंची स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शिफारस करू शकतो.

‘एसएफआय’चे सचिव मोनल चोक्सी यांनी ही माहिती दिली. युनिव्हर्सलिटी कोटय़ातून एका देशाला एक पुरुष व एका महिला जलतरणपटूला ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची परवानगी मिळते. या नियमाच्या पार्श्वभूमीवर श्रीहरी नटराज व माना पटेल या हिंदुस्थानच्या दोन जलतरणपटूंना टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्याची संधी देण्यात आली आहे. श्रीहरीकडे 863, तर माना हिच्याकडे 735 गुण आहेत. माना पटेलचा ऑलिम्पिक स्पर्धेतील सहभाग निश्चित झाला आहे. कारण इतर महिला जलतरणपटूने ऑलिम्पिक निवडीबद्दलचा ‘ब’ निकष मिळविलेला नाही. मात्र श्रीहरी नटराजला अजूत प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कारण श्रीहरीसह सहा जलतरणपटूंनी ऑलिम्पिक मानांकनाचा ‘ब’ निकष मिळविलेला आहे. त्यामुळे या आठवडय़ात ‘अ’ निकषासाठी स्पर्धा होणार आहे. हिंदुस्थानच्या एखाद्या जलतरणपटूने ‘अ’ निकष मिळविला, तर मक युनिव्हर्सलिटी कोटा रद्द होईल. श्रीहरी आणि सजन प्रकाश यांनी 2016च्या रियो आलिम्पिकमध्ये हिंदुस्थानचे प्रतिनिधित्व केले होते. हे दोघेही याच आठवडय़ात रोममध्ये होणाऱया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत ‘अ’ निकष मिळविण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करतील. आतापर्यंत हिंदुस्थानच्या एकाही जलतरणपटूला ऑलिम्पिकसाठीची ‘अ’ पात्रता मिळविता आलेली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या