बुमराह 400 कसोटी बळी टिपू शकतो! जसप्रीतच्या गोलंदाजीवर अॅम्ब्रोस फिदा

वेस्ट इंडीजचे माजी महान वेगवान गोलंदाज कर्टली अॅम्ब्रोस हे हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर भलतेच फिदा झाले आहेत. हिंदुस्थानचा हा प्रमुख गोलंदाज कारकिर्दीत 400 कसोटी बळी टिपू शकतो, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

जसप्रीत बुमराहच्या कारकिर्दीबद्दल भविष्यवाणी करणाऱया कर्टली अॅम्ब्रोस यांचे मत यासाठी महत्त्वाचे आहे, कारण त्यांनी स्वतः 98 कसोटी सामन्यांत 20.99च्या सरासरीने 405 कसोटी बळी टिपलेले आहेत. बुमराहच्या अफलातून गोलंदाजीमुळे ते प्रभावित झाले आहेत. यूटय़ूब चॅनलवर एका शोमध्ये बोलताना अॅम्ब्रोस म्हणाले, मी जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीचा मोठा चाहता आहे. मी बघितलेल्या गोलंदाजांमध्ये तो खूपच वेगळा आहे. त्याची गोलंदाजी शैली भन्नाट आहे. तो चेंडूला सहज सीम व स्विंग करतो. त्याचा यॉर्करही जबरदस्त असतो. त्यामुळे तो प्रदीर्घ काळ खेळू शकला तर नक्कीच 400 कसोटी बळी टिपू शकेल असा मला विश्वास वाटतो, असेही ते म्हणाले.

2018साली कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱया जसप्रीत बुमराहने केवळ 19 कसोटी सामन्यांत 22.10च्या सरासरीने 83 गडी बाद केले आहेत. बुमराहबद्दल बोलताना अॅम्ब्रोस पुढे म्हणाले, त्याचा रनअप तसा फार छोटा आहे. जसप्रीत बुमराह गोलंदाजी करताना बहुतांश वेळ चालतो आणि चेंडू टाकण्यापूर्वी दोन-तीन पावलेच फक्त तो पळतो. त्यामुळे तो स्वतःच्या शरीरावर अधिक दबाव टाकतो असे वाटते. कारण लयीमध्ये रनअप हे वेगवान गोलंदाजांसाठी फार महत्त्वाचे असते. त्यामुळे बुमराह फिट राहिला तर तो नक्की कसोटी क्रिकेटमध्ये मोठी मजल मारेल, यात शंका नाही, असेही अॅम्ब्रोस यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या