देशात प्रथमच डिजिटल जनगणना, दोन वर्षांची मुदत; 34 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती

देशात पुढील वर्षीपासून होणारी जनगणना आगळीवेगळी ठरणार आहे. ही जनगणना प्रथमच पूर्णपणे डिजिटल पद्धतीने म्हणजेच कोणत्याही कागदपत्रांशिवाय होणार आहे. त्यासाठी तब्बल 34 लाख कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात येणार असून हे कर्मचारी दोन वर्षांत गणना पूर्ण करतील.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱया रजिस्टर जनरल ऑफ इंडियाने (आरजीआय) यासाठी तयारी सुरू केली आहे. जनगणनेच्या संपूर्म प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्यासाठी खास वेबसाइटही तयार केली जाणार आहे. जनगणनेसाठी नेमण्यात आलेले कर्मचारी व निरीक्षक स्वतःच्या मोबाइलवर सर्व माहिती संकलित करतील व खास मोबाइल ऍपद्वारे ती केंद्रीय कार्यालयाला ट्रान्सफर करतील. हे ऍप्स इंग्रजी आणि प्रादेशिक भाषांमध्ये उपलब्ध असतील.

  • डिजिटल जनगणना दोन टप्प्यांत होणार आहे.
  • पहिल्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर 2026 या कालावधीत घरांची यादी केली जाईल. यात घराची स्थिती, सुविधांची माहिती घेतली जाईल.
  • दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवारी 2027 पासून लोकसंख्येची गणना करण्याचे काम केले जाईल.
  • कुटुंबातील सदस्यांच्या जातीचीही माहिती घेण्यात येईल.
  • लोकांना स्वतःची गणना करण्याचा पर्याय उपलब्ध असेल.