हिंदुस्थान 5 वर्षांनी पुन्हा चिनी पर्यटकांना देणार व्हिसा देणार, 24 जुलैपासून करता येईल अर्ज

हिंदुस्थानी सरकारने पाच वर्षांच्या खंडानंतर चीनी नागरिकांसाठी पर्यटक व्हिसा पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 24 जुलै 2025 पासून चीनी नागरिकांना हिंदुस्थानात पर्यटनासाठी व्हिसा मिळू शकेल, अशी घोषणा चीनमधील हिंदुस्थानी दूतावासाने केली आहे. कोविड-19 साथीच्या रोगामुळे आणि 2020 मधील गलवान खोऱ्यातील संघर्षानंतर हिंदुस्थान-चीन संबंधांमध्ये तणाव निर्माण झाला होता, त्यामुळे ही सेवा बंद करण्यात आली होती. आता दोन्ही देशांमधील संबंध सुधारण्याच्या दिशेने हे पाऊल उचलण्यात आले आहे.

दरम्यान, 2020 मधील गलवान संघर्षानंतर हिंदुस्थान-चीन संबंध तणावपूर्ण झाले होते. यामुळे हिंदुस्थानने चीनी गुंतवणुकींवर कडक निर्बंध लादले, अनेक चीनी अॅप्सवर बंदी घातली आणि थेट प्रवासी विमानसेवा बंद केली होती. दुसरीकडे चीननेही कोविड-19 च्या काळात हिंदुस्थानी नागरिकांसह परदेशी नागरिकांसाठी व्हिसा सेवा बंद केली होती. 2022 मध्ये चीनने विद्यार्थी आणि व्यावसायिक व्हिसा पुन्हा सुरू केले, परंतु पर्यटक व्हिसा बंदच राहिले होते.