हिंदुस्थानसमोर अमेरिका नतमस्तक, दुबळ्या अमेरिकेवर 6 विकेट्सनी मात

अमेरिका जगात महासत्ता असली तरी क्रिकेटमध्ये हिंदुस्थानचीच सत्ता असल्याचे हिंदुस्थानच्या युवा संघाने दाखवून दिले. अत्यंत एकतर्फी सामन्यात हिंदुस्थानसमोर दुबळी अमेरिका अक्षरशः नतमस्तक झाली आणि 19 वर्षांखालील युवा वर्ल्ड कप स्पर्धेच्या सलामीच्या लढतीत माजी जगज्जेत्या हिंदुस्थानने अपेक्षेप्रमाणे विजयारंभ केला. बुलावायो येथील क्विन्स स्पोर्ट्स क्लबमध्ये पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात हिंदुस्थानने अमेरिकेचा डकवर्थ–लुईस नियमानुसार 6 विकेट्सने पराभव केला.

अमेरिकेकडून मिळालेल्या 108 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हिंदुस्थानची सुरुवात खराब झाली. वैभव सूर्यवंशी अवघ्या 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर पावसामुळे सामना थांबवण्यात आला. पाऊस थांबल्यानंतर डकवर्थ–लुईस नियमानुसार हिंदुस्थानला 37 षटकांत 96 धावांचे सुधारित लक्ष्य मिळाले. पुन्हा मैदानावर परतल्यावर कर्णधार आयुष म्हात्रे आणि वेदांत त्रिवेदी हे संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न करत होते, मात्र त्रिवेदी 2 धावांवर बाद झाला. त्यानंतर विहान मल्होत्रा मैदानात उतरला. संघाची धावसंख्या 25 असताना कर्णधार म्हात्रे 19 धावांवर बाद झाला. पुढे मल्होत्रा आणि अभिषेक कुंडू यांच्यात 45 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी झाली. संघाची धावसंख्या 70 असताना मल्होत्रा 18 धावांवर बाद झाला. अखेरीस कुंडूने 42 धावा करत आणि कर्णिक चौहान (10) याच्या साथीने हिंदुस्थानला विजय मिळवून दिला.

हेमिल पटेलची भेदक गोलंदाजी

त्याआधी, नाणेफेक जिंपून हिंदुस्थानने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि हेमिल पटेलच्या (16 धावांत 5 बळी) भेदक माऱयाच्या जोरावर अमेरिकेला 107 धावांत गुंडाळले. अमेरिकेकडून नितीश सुदिनीने सर्वाधिक 36 धावा केल्या. हिंदुस्थानकडून वैभव सूर्यवंशीनेही प्रभावी गोलंदाजी करत एक विकेट घेतली, तर दीपेश देवेंद्रन, आर. एस. अंबरीश व खिलन पटेल यांना प्रत्येकी एक विकेट टिपला.