ट्रम्प-मोदी बैठकीत 3 अब्ज डॉलर्सच्या ऐतिहासिक संरक्षण करारावर मोहोर

223

महासत्ता अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या हिंदुस्थानभेटीत उभय देशांत व्यापारकरार झाला नाही. मात्र, हिंदुस्थानला 3 अब्ज डॉलर्स किंमतीची लष्करी शस्त्रात्रे आणि उपकरणे पुरविण्याच्या करारावर मात्र अमेरिकेने मंगळवारी मोहोर उठवली. ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीत घेतलेल्या संयुक्त बैठकीत निकटचा मित्र देश म्हणून एक ऐतिहासिक संरक्षण व्यापारावर उभय देशांनी शिक्कामोर्तब केले. दहशतवादाविरोधात जागतिक लढ्यात हिंदुस्थान एक प्रमुख देश असून त्याला सर्वतोपरी सरंक्षण सामुग्री पुरवणे आमचे आद्य कर्तव्य आहे, असे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी यावेळी स्पष्ट केले.

लवकरच उभय देशातील महत्वपूर्ण व्यापार करारावर मोहोर उमटवली जाईल असेही ट्रम्प यांनी दिल्लीतील हैदराबाद हाऊसमध्ये झालेल्या बैठकीला ट्रम्प ,पंतप्रधान मोदी यांच्यासह उभय देशांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.आजच्या बैठकीतील करारानुसार अमेरिकेकडून 24 एमएच-60 हेलीकॉप्टर्स आणि 6 अपाचे हेलिकॉप्टर्स पुरवणार आहे. संरक्षण क्षेत्रातील हायटेक तंत्रज्ञानही पुरवण्याचे आश्वासन अमेरिकेने नव्या कराराद्वारे दिले आहे.

व्यापार कराराबाबत अमेरिकेचे आहिस्ता कदम
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हिंदुस्थानशी होणाऱ्या संभाव्य व्यापारकराराची निश्चिती केली नाही. चीनसोबतच्या व्यापारयुद्धामुळे अमेरिकन मालाला आशिया खंडात मोठी बाजारपेठ हवी आहे. त्यामुळे हिंदुस्थानशी व्यापार करार करण्यापूर्वी अमेरिका आपल्या लाभाच्या क्षेत्रांचा अभ्यास करीत आहे. व्यापार करारात हिंदुस्थानला काही अटी-शर्ती घालून त्याला अंतिम स्वरूप देण्याचे ट्रम्प प्रशासनाचे धोरण आहे. त्यामुळे इंडो -अमेरिका व्यापार करारावर निश्चिती झाली नाही. केवळ भविष्यातील आश्वासनांवर अमेरिकेने वेळ मारून नेली.

दिल्लीतील शिक्षण अभ्यासक्रमाने मेलानिया प्रभावित
नवी दिल्लीतील शाळांमध्ये सुरु असलेला आनंदी शिक्षण अभ्यासक्रम अतिशय प्रेरक आणि उपयुक्त असून मी या अभ्यासक्रमाने अतिशय प्रभावित झाले आहे ,अशी प्रतिक्रिया अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांनी पूर्व दिल्लीतील गुरु नानकदेव विद्यालयाला दिलेल्या भेटीनंतर व्यक्त केली. दिल्ली सरकारने राज्यांतील शाळांमध्ये सुरु केलेला हॅप्पीनेस वर्ग अतिशय लोकप्रिय झाला आहे. त्याची झलक घेऊन मेलानिया अतिशय खुश झाल्या. बालकांच्या उज्वल आणि आनंदी भविष्यासाठी असे शैक्षणिक उपक्रम राबवले जावेत असे मत त्यांनी व्यक्त केले. हिंदुस्थानी जनतेने दिलेल्या अपार प्रेमाबद्दलही मेलानिया यांनी हिंदुस्थानी जनतेचे आभार मानले.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प आणि कन्या इव्हांका ट्रम्प यांनी हिंदुस्थान भेटीत आपल्या पोशाखांनाही हिंदुस्थानी टच दिला आहे. इव्हांकाने मंगळवारी रेशमी शेरवानी परिधान केली होती. ही शेरवानी मराठमोळ्या फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिसाइन केली आहे. शेरवानीची किंमत 82,400 रुपये आहे. “सुरूही शेरवानी” असे या शेरवानीचे नाव असून तिची शिलाई पश्चिम बंगालमधील कारागिरांनी हाताने केली आहे. असे अनिता डोंगरे यांनी सांगितले.

  • अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या पत्नी मेलानिया यांनी मंगळवारी सकाळी दिल्लीच्या राजघाटाला भेट देऊन महात्मा गांधी यांना सुमनांजली वाहिली.त्यानंतर ट्रम्प दाम्पत्याने राजघाट परिसरात एक झाडाचे रोपही लावले. यावेळी केंद्रीय मंत्री हरदीप सिंग त्यांच्यासोबत होते.
  • अमेरिका हिंदुस्थानी लष्कराला 24 एमएच -60 ही अत्याधुनिक हेलिकॉप्टर्स पुरवणार आहे. या हेलिकॉप्टर्सच्या मदतीने हिंदुस्थानी नौदल हिंदी महासागरात शत्रूंच्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवू शकेल.शिवाय चीनच्या हिंदी महासागरातील घुसखोरीला आळा घालण्यासाठी या हेलिकॉप्टर्सचा मोठा उपयोग होणार आहे.
  • हिंदुस्थान आणि अमेरिका मानसिक आरोग्य क्षेत्रातही एकमेकांना परस्पर सहाय्य करणार आहे. शिवाय आरोग्य चिकित्सा उपकरणाच्या सुरक्षेसाठी हिंदुस्थानच्या केंद्रीय औषधे नियंत्रण संघटनेने अमेरिकेच्या फूड अँड ड्रुग्स प्रशासनाशी सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
  • पेट्रोलियम आणि एलएनजी उत्पादन क्षेत्रातही उभय देशांत समझोता झाला आहे. त्यासाठी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन आणि अमेरिकेच्या एक्झान मोबिल इंडिया लिमिटेड व चार्ट इण्डस्ट्रीज यांच्यात सहकार्य करार झाला आहे.
  • जागतिक उत्तेजके आणि ड्रग्ज तस्करीला आळा घालण्यासाठीही हिंदुस्थान आणि अमेरिका एकमेकांना मदत करणार आहे.
  • कट्टरपंथी इस्लामिक दहशतवादाचा बिमोड करण्यासाठी हिंदुस्थान करीत असलेल्या प्रयत्नांना अमेरिका प्राधान्याने मदत करणार.विशेषतः शेजारी पाकिस्तानकडून होत असलेल्या दहशतवादी कारवायांबाबतही पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यात सविस्तर चर्चा झाली.
आपली प्रतिक्रिया द्या