चला, सुपर एट जिंकूया! आज हिंदुस्थानची गाठ अफगाणिस्तानशी, विराटच्या कामगिरीवर सर्वांच्या नजरा

हिंदुस्थानी संघाला साखळीत अपेक्षित कामगिरी करता आली नसली तरी अपराजित असलेला संघ आता अफगाणिस्तानशी भिडणार आहे. सुपर एटमध्ये हिंदुस्थान तीन सामने खेळणार असून अफगाणिस्तान आणि बांगलादेशविरुद्धच्या लढती जिंकून उपांत्य फेरीत आपले स्थान निश्चित करण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. अफगाणी खेळाडूंनीही जोरदार कामगिरी केल्यामुळे हिंदुस्थानसाठी सुपर एटचा पहिला साखळी सामना नक्कीच सोप्पा नसेल.

हिंदुस्थान साखळीत अपराजित असला तरी पाकिस्तानविरुद्ध हिंदुस्थानी फलंदाजीला चांगलेच झगडावे लागले होते. अमेरिकेनेही हिंदुस्थानला तोडीस तोड उत्तर दिले होते. त्यातच अमेरिकन खेळपट्टी फलंदाजीस घातक असल्यामुळे आपले रथी-महारथी अजूनही सुरात आलेले नाहीत. सर्वात जास्त चिंता विराट कोहलीच्या फॉर्मची आहे. कोहलीला गेल्या तिन्ही डावांत एकदाही दोन अंकी धावसंख्या गाठता आलेली नाही. त्यामुळे त्याला सलामीला पाठवण्याचा प्रयोग यशस्वी ठरावा म्हणून हिंदुस्थानी संघानेच देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. जर त्याची अपयशाची मालिका अफगाणिस्तानविरुद्धही कायम राहिली तर विराटला पुन्हा खाली खेळवावे लागणार आहे.

फलंदाजांना रंग दाखवावा लागणार

हिंदुस्थानचे दिग्गज फलंदाज तीनपैकी केवळ एकाच सामन्यात खेळले आहेत. याचे खापर सर्वस्वी अमेरिकन खेळपट्टीवर पह्डण्यात आले आहे. त्यामुळे प्रथमच वेस्ट इंडीजच्या खेळपट्टय़ांवर उतरणाऱया हिंदुस्थानच्या फलंदाजांना आपला रंग दाखवावाच लागणार आहे. रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, शिवम दुबे, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा कुणालाही आपला खेळ दाखवता आलेला नाही. त्यामुळे उद्या अफगाणी गोलंदाजांवर हिंदुस्थानी तुटून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही.

अफगाणचे सारेच जोरात

टी-20 वर्ल्ड कपमध्ये फलंदाजी असो किंवा गोलंदाजी, हे तालिकेवर अफगाणी खेळाडूंचेच वर्चस्व कायम आहे. फलंदाजीत गुरबाज आणि इब्राहिम झादरान टॉप टेनमध्ये आहेत तर गोलंदाजीत फझलहक फारुकीला कुणीही मागे टाकू शकलेला नाही. तसेच राशीद खान आणि नवीनूल हकच्या गोलंदाजीनेही फलंदाजांना हादरवले आहे. त्यामुळे या फॉर्मात असलेल्या संघाविरुद्ध हिंदुस्थानला आपला सर्वोत्तम खेळ दाखविण्याशिवाय पर्याय नाही. हिंदुस्थानसाठी एकच समाधानाची बाब आहे की, टी-20 वर्ल्ड कपमध्ये अफगाणिस्तानचा संघ हिंदुस्थानवर एकही विजय मिळवू शकलेला नाही.

कुलदीपला संधी मिळणार

हिंदुस्थानची फलंदाजी खोलवर असली तरी त्याचा लाभ अद्याप एकाही सामन्यात झालेला नाही. आपली फलंदाजी मजबूत व्हावी म्हणून कुलदीपऐवजी अक्षर पटेलला संधी देण्यात आली आहे. उद्या हिंदुस्थान कुलदीपला उतरवण्याचा निर्णय घेऊ शकतो. तसेच हिंदुस्थानच्या गोलंदाजीची मदार जसप्रीत बुमराच्या खांद्यावरच असेल. पण मोहम्मद सिराज, हार्दिक पंडयाही आपला प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरल्यामुळे अफगाणिस्तानच्या माऱयापेक्षा हिंदुस्थानचा मारा अधिक प्रभावी आहे, याबाबत कुणाच्याही मनात शंका नसेल.