हिंदुस्थानने मालिका गमावली; ऑस्ट्रेलियाचा 11 धावांनी रोमहर्षक विजय

211
MELBOURNE, AUSTRALIA - FEBRUARY 12: Jess Jonassen of Australia (C) celebrates after claiming her fifth wicket during the Women's Twenty20 Tri-Series Final between Australia and India at Junction Oval on February 12, 2020 in Melbourne, Australia. (Photo by Daniel Pockett/Getty Images)

हिंदुस्थानच्या महिला क्रिकेट संघाने बुधवारी हातातोंडाशी आलेला विजय ऑस्ट्रेलियाकडे सुपूर्द केला. 156 धावांचा पाठलाग करणाऱया हिंदुस्थानचा संघ 3 बाद 115 धावा अशा स्थितीत होता. पण त्यानंतर मेगन शुटने स्मृती मंधानाला 66 धावांवर बाद केले आणि तिथून हिंदुस्थानच्या डावाला सुरुंग लागले. 30 धावांमध्ये हिंदुस्थानच्या संघाने 7 फलंदाज गमावले. अखेर यजमान ऑस्ट्रेलियाने 11 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आणि तिरंगी टी-20 मालिकेच्या जेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या पराभवामुळे टी-20 वर्ल्ड कपआधी हिंदुस्थानी संघाच्या आत्मविश्वासाला तडा गेला.

जेस जोनासनचे 5 बळी

हिंदुस्थानच्या स्टार फलंदाजांना या डावात अपयशाचा सामना करावा लागला. शफाली वर्मा (10 धावा), रिचा घोष (17 धावा), जेमिमा रॉड्रिग्स (2 धावा), हरमनप्रीत कौर (14 धावा), दीप्ती शर्मा (10 धावा) यांच्याकडून निराशा झाली. डावखुरी फिरकी गोलंदाज जेस जोनासनने 12 धावा देत हिंदुस्थानचा निम्मा संघ गारद केला.

बेथ मुनीच्या दमदार 71 धावा

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. सलामी फलंदाज बेथ मुनीने 54 चेंडूंत 9 चौकारांसह नाबाद 71 धावांची खेळी साकारली. हिंदुस्थानकडून दीप्ती शर्मा व राजेश्वर गायकवाड यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद केले.

महाराष्ट्राची स्मृती लढली

ऑस्ट्रेलियाकडून हिंदुस्थानसमोर 156 धावांचे आव्हान ठेवण्यात आले. महाराष्ट्राच्या स्मृती मंधानाने सलामीला येऊन 12 चौकारांसह 66 धावांची खेळी साकारत हिंदुस्थानला विजयाची आशा दाखवलीय. तिने या धावा फक्त 37 चेंडूंत फटकावल्या, पण इतर एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.

आपली प्रतिक्रिया द्या