नाद करा पण ‘हिटमॅन’चा कुठं! रोहित शर्मानं सिडनीत ठोकलं 50 वं आंतरराष्ट्रीय शतक, विराटचंही अर्धशतक

ऑस्ट्रेलियाविरुद्ध तिसऱ्या आणि अखेरच्या वन डे लढतील हिटमॅन रोहित शर्मा याने खणखणीत शतक ठोकले आहे. झम्पाच्या गोलंदाजीवर सिंगल घेत रोहितने 33 व्या एक दिवसीय शतकाला गवसणी घातली. ऑस्ट्रेलियाविरुद्ध हे त्याचे नववे शतक आहे. 105 चेंडूत 11 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने रोहितने तीन आकडी संख्या गाठण्याचा कारनामा केला. तर दुसरीकडे पहिल्या दोन्ही लढतीत शून्यावर बाद झालेल्या विराट कोहली यानेही अर्धशतकीय खेळी करत मन जिंकले. दोघांनी अखेरपर्यंत मैदानात शड्डू ठोकून हिंदुस्थानला 9 विकेटने विजय मिळवून दिला. रोहित 121, तर विराट 74 धावांवर नाबाद राहिला.

पहिल्या लढतीत लवकर बाद झाल्याने रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यावर टीका होत होती. त्यानंतर रोहितने दुसऱ्या लढतीत अर्धशतक ठोकत टीकाकारांची तोंड बंद केली, मात्र विराट सलग दुसऱ्या लढतीत शून्यावर बाद झाला होता. त्यानंतर तिसरी लढत दोघांसाठी खास होती. कारण दोघांचीही ही ऑस्ट्रेलियातील शेवटची इनिंग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे दोघांच्या कामगिरीकडे लक्ष लागले होते.

सिनडी क्रिकेट ग्राउंडही खचाखच भरले होते आणि प्रेक्षकांना जे अपेक्षित होते तेच घडले. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी दमदार खेळी केली. रोहितने शतक, तर विराट कोहलीने अर्धशतक ठोकले. विशेष म्हणजे रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकांचा टप्पाही गाठला.

कसोटीमध्ये रोहित शर्माच्या नावावर 12 शतकांची नोंद आहे. तर वन डे मध्ये 33 आणि टी-20 मध्ये 5 शतके रोहितच्या नावावर आहेत. तिन्ही फॉरमॅट मिळून आता त्याच्या नावावर 50 शतकांची नोंद झाली आहे.

विक्रमांचा सामना

– विराट-रोहितने शतकी भागिदारी केली. वन डे मध्ये सर्वाधिक शतकी भागिदारी करणारे (19) ही तिसरी सर्वात यशस्वी जोडी आहे. तेंडुलकर-गांगुलीने 26, तर संघगारा-दिलशानने 20 वेळा अशी कामगिरी केली आहे.

– विराट कोहली याने सर्वाधिक वन डे धावांमध्ये कुमार संघकारा (14234 धावा) याला मागे सोडले. आता विराट दुसऱ्या स्थानावर पोहोचला असून त्याच्यापुढे सचिन तेंडुलकर (18426 धावा) आहे.

– ऑस्ट्रेलियामध्ये पाहुण्या संघाकडून वन डे खेळताना सर्वाधिक 6 शतक ठोकणअयाचा विक्रम रोहितने केला. त्याने विराट कोहली आणि कुमार संघकारा (प्रत्येकी 5 शतक) यांना मागे सोडले.