कोलकाता कसोटी – सोन्याच्या नाण्याने टॉस, जेवणाचा खास मेन्यू आणि बरंच काही…

1189

हिंदुस्थान आणि बांगलादेश संघात 22 नोव्हेंबर पासून कोलकातामध्ये डे-नाईट कसोटी सामना सुरू होणार आहे. टीम इंडिया पहिल्यांदाच डे-नाईट कसोटी सामना खेळणार आहे. कोलकातात होणाऱ्या या कसोटीला खास बनवण्यासाठी देशविदेशातील दिग्गजांची उपस्थिती असणार आहे. या खास क्षणांचा आनंद घेण्यासाठी थेट बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना कोलकातामध्ये दाखल होणार आहेत.

बीसीसीआयचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी शेख हसिना यांनी कोलकाता कसोटीला उपस्थित राहण्याचे निमंत्रण दिले आहे. बीसीसीआयचे निमंत्रण शेख हसिना यांनी स्वीकारले आहे. शेख हसिना यांच्यासह हिंदुस्थानी क्रिकेटमधील अनेक दिग्गज खेळाडूंनाही या कसोटीचे आमंत्रण देण्यात आले आहे.

#INDvBAN धोनी मैदानावर पुन्हा येतोय, फलंदाज म्हणून नाही तर …

शेख हसिना यांच्या पाहुणचारासाठी मोठी तयारी करण्यात आली आहे. शेख हसिना यांच्या जेवणामध्ये तब्बल 50 मिष्ठान्न बनवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. यात प्रसिद्ध हिल्सा मासा, पाब्डा मासा, भेटकी मासा आणि दाब चिंग्री यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे. यासह पारंपारिक बंगाली पदार्थ शुक्तो, आलू पोस्तो, रोस्टेड कॉलीफ्लॉवर, चनार डालना आणि पुलाव चटनी यांचीही पंगतीला रेलचेल असणार आहे.

दरम्यान, पहिल्या-वहिल्या डे-नाईट कसोटीला खास बनवण्यासाठी बंगाल क्रिकेट बोर्डाने (सीएबी) ग्रँड वेलकमची तयारी सुरू केली आहे. खास पाहुण्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या कसोटीचा नाणेफेक सोन्याच्या नाण्याने केला जाणार आहे. चंदेरी नाणे पाहुण्यांना एक आठवण म्हणून भेट देण्यात येणार आहे.

आपली प्रतिक्रिया द्या