ग्वाल्हेरच्या माधवराव शिंदे स्टेडियमवर दणदणीत विजय मिळविल्यानंतर हिंदुस्थानचा नव्या दमाचा टी-20 संघ दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर ‘रनवृष्टी’ करण्यासाठी सज्ज झालाय. तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 आघाडी घेतल्यामुळे दिल्ली जिंकून टी-20 मालिकाही खिशात घालण्याचे ध्येय टीम इंडियाने आधीच निश्चित केलेय.
रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जाडेजाच्या टी-20 निवृत्तीनंतर हिंदुस्थानी संघात स्थान निर्माण करण्यासाठी निवड समिती नव्या दमाच्या अनेक खेळाडूंना संधी देणार, हे आधीच ठरले होते. त्यानुसार पहिल्या सामन्यात मयांक यादव आणि नीतिशकुमार रेड्डीला पदार्पण करता आले. आता दुसऱ्या सामन्यात हर्षित राणालाही पदार्पण करता येऊ शकेल. तसेच रियान परागलाही आपल्या फिरकीची कमाल दाखवता येऊ शकते. ही नव्या दमाच्या खेळाडूंच्या शिकण्याची मालिका असल्यामुळे प्रत्येक सामन्यात दोन-तीन बदल अपेक्षित आहेत. उद्याही त्यात नक्कीच बदल असतील. संघात बदल केले तरी हिंदुस्थानचा संघ बांगलादेशच्या तुलनेत बलशाली आहे.
ग्वाल्हेरला अर्शदीपसह वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीने साऱ्यांनाच प्रभावित केले होते. वॉशिंग्टन सुंदरलाही आपले अष्टपैलूत्व दाखवून देण्याची संधी मिळाली होती. या मालिकेत जो संधीचे सोने करील, तोच आगामी मालिकेसाठी आपले स्थान आतापासूनच पक्के करू शकतो.