हिंदुस्थान-इंग्लंड कसोटी मालिका- स्टोक्स, आर्चर, बर्न्स हिंदुस्थानात दाखल

हिंदुस्थान-इंग्लंडदरम्यान 5 फेब्रुवारीपासून कसोटी क्रिकेट मालिका सुरू होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर इंग्लंडचा प्रमुख अष्टपैलू बेन स्टोक्स, वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चर Joffra Archerव रोरी बर्न्स हे क्रिकेटपटू रविवारी चेन्नईत दाखल झाले. इंग्लंडचा संघ सध्या श्रीलंका दौऱयावर असून, या संघाचे उर्वरीत खेळाडू बुधवारी हिंदुस्थानात दाखल होतील. स्टोक्स, आर्चर व बर्न्स यांना श्रीलंका दौऱयासाठी विश्रांती देण्यात आली होती. त्यामुळे हे तीन खेळाडू इंग्लंडहून हिंदुस्थानात दाखल झाले आहेत.

2 फेब्रुवारीपर्यंत क्वारंटाइन

बेन स्टोक्ससह जोफ्रा आर्चर व रोरी बर्न्स हे खेळाडू नियमानुसार 2 फेब्रुवारीपर्यंत चेन्नईतील लीला पॅलेस हॉटेलमध्ये क्वारंटाइन राहणार आहेत. क्वारंटाइन कालावधी संपल्यानंतर या तिघांचीही कोरोना चाचणी होईल व मगच त्यांना इंग्लंड संघाच्या बायो-बबलमध्ये प्रवेश दिला जाणार आहे. उभय संघांच्या निवासाची याच हॉटेलमध्ये व्यवस्था करण्यात आलेली आहे. बायो बबलच्या कारणामुळे या हॉटेलमध्ये दोन्ही संघांतील सदस्यांना सोडून इतर पाहुण्यांना परवानगी मिळणार नाही. हॉटेलमध्ये दाखल होताच प्रत्येकाची कोरोना चाचणी होईल. कसोटी मालिकेला प्रारंभ होण्याआधी, पुन्हा प्रत्येकाच्या दोन-दोन चाचण्या होणार आहेत.

जॉनी बेयरस्टोची निवड नाही

बेन स्टोक्ससह जोफ्रा आर्चर व रोरी बर्न्स यांचे इंग्लंडच्या कसोटी संघात पुनरागमन झाले आहे. मात्र, यष्टीरक्षक फलंदाज जॉनी बेयरस्टो या महत्त्वाच्या खेळाडूची हिंदुस्थानसारख्या खडतर दौऱयावर इंग्लंडच्या संघात निवड करण्यात आलेली नाही. त्यामुळे नासिर हुसैन व मायकल वॉनसह इंग्लंडच्या अनेक माजी खेळाडूंनी आपल्या संघनिवड समितीच्या धोरणावर टीका केली आहे.

पहिल्या दोन कसोटीसाठी इंग्लंडचा संघ – जो रूट (कर्णधार), जोफ्रा आर्चर, मोईन अली, जेम्स अॅण्डरसन, डॉम बेस, स्टुअर्ट ब्रॉड, रोरी बर्न्स, जोस बटलर, जॅक क्राउली, बेन फॉक्स, डॅन लॉरेन्स, जॅक लीच, डॉम सिबली, बेन स्टोक्स, ओली स्टोन, ख्रिस वोक्स.

राखीव खेळाडू – जेम्स ब्रेसी, मॅसन व्रेन, साकिब महमूद, मॅथ्यू पार्ंवैसन, ओली रॉबिंसन, अमर विर्दी.

आपली प्रतिक्रिया द्या