जागतिक स्पर्धेचे फायनलचे तिकीट पणाला, हिंदुस्थान-इंग्लंड यांच्यात आजपासून तिसरी कसोटी

चार सामन्यांची कसोटी क्रिकेट मालिका 1-1 अशी बरोबरीत असल्याने नव्या स्टेडियममधील मोटेराच्या नव्या खेळपट्टीवर होणाऱया दिवस-रात्र कसोटीला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. गुलाबी चेंडूवर होणाऱया या सामन्यासाठी यजमान हिंदुस्थान व पाहुणा इंग्लंड संघ सज्ज झालाय. गतसामन्यात विराट कोहलीच्या सेनेने जो रूटच्या ब्रिगेडला चारीमुंडय़ा चीत केले असले तरी बुधवार, 24 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱया तिसऱया कसोटीत इंग्लंडवर वर्चस्व गाजविण्यासाठी ‘टीम इंडिया’ला गुलाबी चेंडू योग्य पद्धतीने हताळावा लागणार आहे. याप्रसंगी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलचे तिकीट पणाला लागले आहे. हिंदुस्थानच्या संघाला तिसऱया किंवा चौथ्या कसोटीत पराभवाचा चेहरा पाहावा लागल्यास जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या फायनलला मुकावे लागणार आहे. त्यामुळे उद्यापासून दोन कसोटींचे दहा दिवस टीम इंडियाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.

रात्रीचे सत्र निर्णायक ठरणार

दिवस-रात्र कसोटी सामना अर्थातच दुपारी अडीच वाजता सुरू होईल. त्यामुळे अखेरच्या सत्रात रात्री काय नाटय़ घडते यावर या कसोटीचे चित्र अवलंबून असणार आहे. कारण सायंकाळनंतर मैदानावर दव पडायला सुरुवात होते. यावेळी मध्यमगती गोलंदाजांना चेंडूवर पकड ठेवणे नक्कीच थोडे अवघड जाणार आहे.

गोलंदाजीत बदलाची शक्यता

अहमदाबादच्या नव्या स्टेडियमवर होणारा तिसरा कसोटी सामना दिवस-रात्र आणि गुलाबी चेंडूवर होणार आहे. त्यामुळे चेन्नईत दुसऱया कसोटीत चांगली कामगिरी केल्यानंतरही ‘टीम इंडिया’त काही बदल होण्याची दाट शक्यता आहे. रोहित शर्मा व शुभमन गिल ही सलामीची जोडी कायम असेल. मधल्या फळीची जबाबदारी कर्णधार विराट कोहली व चेतेश्वर पुजारा यांच्यावर असेल. यष्टिरक्षकाच्या भूमिकेही रिषभ पंत कायम राहील. मात्र मोटेराची खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना पोषक ठरण्याची शक्यता असल्याने गोलंदाजीत बदल अपेक्षित आहेत. वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे संघातील पुनरागमन निश्चित आहे. त्यामुळे नव्या दमाच्या मोहम्मद सिराजला बसावे लागेल. फिरकीपटू कुलदीप यादवच्या जागेवर अष्टपैलू हार्दिक पांडय़ाला स्थान मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे फिरकीची जबाबदारी रविचंद्रन अश्विन व अक्षर पटेल या जोडीवर असेल.

  • आजपासून तिसरी कसोटी – हिंदुस्थान-इंग्लंड दुपारी 2.30 वाजता
आपली प्रतिक्रिया द्या