वेलिंग्टन कसोटीत न्यूझीलंड विजयी, हिंदुस्थानवर 10 गडी राखून मात

2194

न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत हिंदुस्थानी संघाला पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. न्यूझीलंडविरुद्ध वेलिंग्टन कसोटी सामन्यात, यजमान संघाने हिंदुस्थानवर 10 गडी राखून विजय मिळवला.

पहिल्या डावात सुमार कामगिरी करणाऱ्या हिंदुस्थानच्या फलंदाजांना दुसऱ्या डावातही निराशेचा सामना करावा लागला. पृथ्वी शॉ (14 धावा), चेतेश्वर पुजारा (11 धावा) व कर्णधार विराट कोहली (19 धावा) यांच्या फ्लॉप शोमुळे हिंदुस्थानची पहिल्या कसोटीच्या तिसऱ्या दिवसअखेरीस बिकट अवस्था होऊन बसली.एका क्षणाला भारतीय संघाला डावाने पराभव स्विकारावा लागतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र तळातल्या फलंदाजांनी ही नामुष्की टाळली. दुसऱ्या डावात हिंदुस्थानी संघाने न्यूझीलंडला केवळ 9 धावांचं आव्हान दिलं. लॅथम आणि ब्लंडल या फलंदाजांनी विजयासाठी आवश्यक असलेल्या धावांची औपचारिकता पूर्ण करत न्यूझीलंडला मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवून दिली आहे. न्यूझीलंडचा कसोटी क्रिकेटमधला हा शंभरावा विजय ठरला आहे.

वेलिंग्टन कसोटी सामन्यात सलग दुसऱ्या डावातही हिंदुस्थानी फलंदाजांनी निराशा केली. चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला न्यूझीलंडच्या गोलंदाजांसमोर शरणागती पत्करल्यामुळे हिंदुस्थानी संघ दुसऱ्या डावात फक्त 191 धावांची मजल मारू शकला. ज्यामुळे न्यूझीलंडला विजयासाठी अवघं 9 धावांचं आव्हान मिळालं. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा टीम इंडिया 39 धावांनी पिछाडीवर होती. त्यामुळे चौथ्या दिवशी हिंदुस्थानी फलंदाज संयमाने फलंदाजी करतील असा अंदाज होता, मात्र ट्रेंट बोल्टने अजिंक्य रहाणेला माघारी धाडत हिंदुस्थानला पहिला धक्का दिला.

यानंतर भारताचे सर्व फलंदाज एकामागोमाग एक माघारी परतत राहिले. एका क्षणाला हिंदुस्थानचा डावाने पराभव स्वीकारण्याची वेळ आलेली होती. मात्र अखेरच्या फळीत ऋषभ पंत आणि इशांत शर्मा यांनी फटकेबाजी करत लाजिरवाणा पराभव टाळला. मात्र न्यूझीलंडच्या माऱ्यासमोर हे फलंदाजही फारवेळ टिकले नाहीत. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसनने लावलेल्या क्षेत्ररक्षणापुढे हिंदुस्थानी फलंदाजांना धावा करण्याची संधीच दिली नाही. दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून टीम साऊदीने 5 तर ट्रेंट बोल्टने 4 बळी घेतले. तर डी-ग्रँडहोमला एक बळी मिळाला.

आपली प्रतिक्रिया द्या