अखेरच्या चेंडूपर्यंत ब्लडप्रेशर वाढविणाऱया दुसऱया एकदिवसीय क्रिकेट सामन्यात यजमान हिंदुस्थानच्या महिलांनी दक्षिण आफ्रिकेवर 4 धावांनी विजय मिळविला. उभय संघांकडून 646 धावांची लयलूट झालेल्या या सामन्यात उपकर्णधार स्मृती मानधना व कर्णधार हरमनप्रीत कौर यांच्या दमदार शतकांना यशाचा टिळा लागला. मात्र दक्षिण आफ्रिकेची कर्णधार लॉरा वोल्वार्ड व मॅरिझान पॅप यांची झुंजार शतके व्यर्थ ठरली. या विजयासह हिंदुस्थानी महिलांनी तीन सामन्यांची मालिका 2-0 अशी आधीच खिशात घातली.
हिंदुस्थानकडून मिळालेल्या 326 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दक्षिण आफ्रिकेला 6 बाद 321 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर लॉरा वोल्वार्ड (नाबाद 135) व मधल्या फळीतील मॅरिझान पॅम (114) यांनी शतके ठोकून दक्षिण आफ्रिकेच्या आशा पल्लवीत केल्या होत्या. मॅरिझानने आपल्या शतकी खेळीत 94 चेंडूंत 11 चौकार व 3 षटकार ठोकले, तर लॉराने 135 चेंडूंत 12 चौकार व 3 षटकारांसह आपली नाबाद शतकी खेळी सजविली. मॅरिझान बाद झाल्यानंतर नॅडीन डी क्लर्कने 28 धावा करीत सामन्यात रंगत निर्माण केली. मात्र, पूजा वस्त्राकरने अखेरच्या षटकातील तिसऱया व चौथ्या चेंडूवर विकेट घेत दक्षिण आफ्रिकेच्या घश्यापर्यंत गेलेला सामना खेचून आणला. हिंदुस्थानकडून दीप्ती शर्मा व पुजा वस्त्राकर यांनी 2-2 फलंदाज बाद केल्या, तर अरुंधती रेड्डी व स्मृती मानधना यांनी 1-1 बळी मिळाला. त्याआधी, नाणेफेक जिंकून हिंदुस्थानला फलंदाजीचे निमंत्रण देण्याचा निर्णय दक्षिण आफ्रिकेच्या चांगलाच अंगलट आला. मात्र, बंगळुरूच्या संथ खेळपट्टीवर सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेच्या गोलंदाजांनी हिंदुस्थानी फलंदाजांना जखडून ठेवले होते. त्यामुळे हिंदुस्थानला पहिल्या 10 षटकांत केवळ 28 धावा करता आल्या. त्यातच शेफाली वर्मा 20 धावांवर बाद झाली. 50 धावांसाठी 17 षटकांपर्यंत वाट बघावी लागली. मात्र त्यानंतर स्मृती मानधना आणि दयालन हेमलता यांनी वेगवान फलंदाजी करत अवघ्या 57 चेंडूत 50 धावांची भागीदारी केली. 23 षटकांत धावफलकावर 100 धावा लागलेल्या असताना हेमलता (24) बाद झाली. त्यानंतर मानधनाने कर्णधार हरमनप्रीत काwरच्या साथीने डाव सावरला. या कर्णधार-उपकर्णधाराच्या जोडीने 136 चेंडूंत 171 धावांची भागीदारी केली. स्मृती मानधनाने झेलबाद होण्यापूर्वी 120 चेंडूंत 2 षटकार आणि 18 चौकारांसह 136 धावांची खेळी केली. लागोपाठ एकदिवसीय शतके झळकाविणारी मानधना ही पहिली हिंदुस्थानी महिला फलंदाज ठरली,