कोलकात्यावरचा कसोटी संग्राम आजपासून; फिरकीस्त्रासह उतरणार हिंदुस्थान आणि दक्षिण आफ्रिकन संघ

सहा वर्षांनंतर ईडन गार्डन्सवर परतलेल्या कसोटी क्रिकेटचा संग्राम यजमान हिंदुस्थान-दक्षिण आफ्रिका यांच्यात शुक्रवारपासून सुरू होतोय. दोन्ही संघांना ही मालिका जागतिक कसोटी अजिंक्यपदाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली हिंदुस्थान घरच्या मैदानावर वर्चस्व टिकवण्याच्या इराद्याने उतरणार आहे, तर दुसरीकडे तेम्बा बावुमाच्या नेतृत्वाखालील दक्षिण आफ्रिका 1991 पासून हिंदुस्थानमध्ये न मिळालेल्या ऐतिहासिक विजयाचे ध्येय साध्य करण्यासाठी सज्ज झाले आहेत. यासाठी दोन्ही संघ फिरकीस्त्रासह उतरणार आहेत, हे विशेष.

फिरकीच्या जाळय़ात कोण सापडणार?

गेल्या वर्षी न्यूझीलंडच्या फिरकीने हिंदुस्थानच्या फलंदाजीची दुखरी नस शोधली होती. त्या मालिकेत किवी फिरकी त्रिकुटाने तब्बल 36 विकेट्स घेतल्या होत्या. त्या जखमा अजूनही ताज्या आहेत. आता ईडनवरही परिस्थिती जवळपास तशीच आहे. फिरकीवीर महाराज, हार्मर आणि मुथुस्वामी या आफ्रिकन फिरकी त्रिकुटाने पाकिस्तानविरुद्ध मिळवलेल्या 35 विकेट्स अजूनही सर्वांच्या नजरेसमोर आहेत. आफ्रिकेचा हा फिरकी हल्ला अगदी उपखंडातील संघाची आठवण करून देतो, अशी कबुलीही हिंदुस्थानचे सहाय्यक प्रशिक्षक रायन टेन डोइशे यांनी दिली.

तिसऱ्या क्रमांकाचा गोंधळ सुदर्शन की जुरेल?

तिसऱ्या क्रमांकावर साई सुदर्शन उतरणार की फॉर्मात असलेला जुरेल. यावर अजूनही संभ्रम कायम आहे. जैसवाल-राहुल ही सलामीची जोडी निश्चित तर चौथ्या स्थानावर कर्णधार गिल आणि त्यानंतर पंत. या समीकरणामुळे सुदर्शनला बेंचवर बसावे लागू शकते.

हिंदुस्थानचा फिरकी हल्ला

कोलकात्याची खेळपट्टी फिरकीला पोषक अशी बनविण्यात आली आहे. अशा स्थितीत जाडेजा-अक्षर-वॉशिंग्टन-कुलदीप अशी चार फिरकीवीरांची फळी उतरवण्याचा हिंदुस्थानचा गंभीर विचार आहे. तिघेही फिरकीपटू फलंदाजीसाठीही उपयोगी असल्याने खालच्या क्रमांकापर्यंत फलंदाजीची ताकद उभी राहू शकते. बुमरा आणि सिराज हिंदुस्थानचे आक्रमण सांभाळतील. ईडनवर गेल्या 15 वर्षांत 61 पेक्षा अधिक विकेट्स वेगवान गोलंदाजांनी घेतल्या आहेत. त्यामुळे बुमराचा प्रभाव निर्णायक ठरू शकतो.

बावुमा आणि संतुलित आघाडी

तेम्बा बावुमा अजूनपर्यंत कसोटी मालिकेत पराभूत झालेला नाही. फॉर्ममध्ये परतलेल्या मार्करम, ब्रेविस, रिकेलटन यांच्यासह त्यांची फलंदाजी मजबूत आहे. तर रबाडा-यानसेनचा वेग आणि महाराज-हार्मर-मुथुस्वामीची त्रिकूट फिरकी ही जबरदस्त कॉम्बिनेशन तयार झाले आहे. सहा वर्षांनंतर ईडनवरील कसोटी परतत आहे.

गिलची तरुण सेना, पंतचा आवाज, बुमराचा रन-अप आणि जाडेजाची जादू. सगळं मिळून कोलकात्याची हवा क्रिकेटमय झाली आहे. तर आफ्रिका आपल्या फिरकी त्रिकुटावर स्वार होऊन हिंदुस्थानी उपखंडातील नवी कहाणी लिहायला सज्ज झाला आहे.

पंतच्या पुनरागमनाने ताकद वाढली

हिंदुस्थानी चाहत्यांसाठी सर्वात मोठी भेट म्हणजे ऋषभ पंतच्या पुनरागमनाची घोषणा! दुखापतीतून परतलेल्या पंतच्या उपस्थितीने मधल्या फळीत जोश आणि स्थिरता दोन्ही येणार आहेत. त्याचबरोबर ध्रुव जुरेलही तुफान फॉर्ममध्ये आहेत. दक्षिण आफ्रिका ‘अ’ विरुद्ध दोन शतके ठोकल्यानंतर त्याची टीममध्ये एण्ट्री झालेली आहे आणि ते केवळ फलंदाज म्हणून तो उतरण्याची दाट शक्यता आहे. नीतीश रेड्डीच्या जागी त्याला स्थान दिलेय.

संभाव्य संघ

हिंदुस्थान यशस्वी जैसवाल, के. एल. राहुल, ध्रुव जुरेल/साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), ऋषभ पंत (यष्टिरक्षक), रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, जसप्रीत बुमरा, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव.

. आफ्रिका एडन मार्करम, रायन रिकल्टन, टोनी जॉर्जी, तेम्बा बवुमा (कर्णधार), डेवाल्ड ब्रेविस, कायल वेरेन ( यष्टिरक्षक), मार्को यानसन, केशव महाराज, सायमन हार्मर, शेनुरन मुथुस्वामी,  कॅगिसो रबाडा.