तेव्हा धोनीने माझे ऐकले नव्हते, 2011 वर्ल्डकप नाणेफेक वादावर संगकाराने सोडले मौन

2613

हिंदुस्थान आणि श्रीलंकेत 2011 ला रंगलेल्या विश्वचषकाच्या अंतिम लढतीचे क्षण प्रत्येक हिंदुस्थानी क्रीडा चाहत्याच्या मनात कोरले गेले आहेत. महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना हिंदुस्थानने तब्बल 28 वर्षांनी वर्ल्डकप जिंकला होता. मात्र या लढतीच्या सुरुवातीला नाणेफेकीवरून वाद झाला होता. या वादावर आता श्रीलंकेचा तत्कालीन कर्णधार कुमार संगकारा याने मौन सोडले आहे.

मुंबईतील वानखेडेच्या खचाखच भरलेल्या मैदानात विश्वचषकाचा अंतिम सामना रंगला होता. या लढतीच्या सुरुवातीला दोनदा नाणेफेक झाला होता. त्यामुळे मोठा वाद झाला. यावर पहिल्यांदाच संगकारा याने प्रतिक्रिया दिली आहे. हिंदुस्थानचा अष्टपैलू खेळाडू आर.अश्विन याच्यासोबत इन्स्टाग्रामवर लाईव्ह बोलताना संगकाराने त्या वेळी नक्की काय घडले याबाबत सांगितले आहे.

अंतिम लढत सुरू होण्यापूर्वी वानखेडेवर पहिल्यांदा नाणेफेक झाला तेव्हा मोठा गोंधळ उडाला होता. मैदानात प्रेक्षकांचा एवढा आवाज होता की हिंदुस्थानचा कर्णधार महेंद्रसिंग धोनी याला माझा आवाज ऐकू आला नाही. त्याने मला विचारले की मी नक्की छापा बोललो की काटा? मी छापा बोललो होतो आणि नाणेफेक जिंकलो होतो. मॅच रेफ्रिला मी तसे स्पष्ट सांगितलेही. तेव्हा धोनीने काहीतरी गडबड झाल्याचे सांगितले आणि पुन्हा नाणेफेक करण्याचा निर्णय झाला. पण दुसऱ्यांदा देखील मीच नाणेफेक जिंकलो.

संगकारा पुढे म्हणतो, मी नशिबानेच दुसऱ्यांदा नाणेफेक जिंकला. धोनीने नाणेफेक जिंकला असता तर त्याने प्रथम फलंदाजी घेतली असती हे मला पक्के ठाऊक होते. मात्र नाणेफेकीचा गोंधळ मैदानातील दर्शकांमुळे झाला. तिथे खूप गोंधळ होता.

हिंदुस्थानचा विजय
अंतिम लढतीत महेला जयवर्धनेच्या शतकाच्या जोरावर श्रीलंकेने 50 षटकात 6 बाद 274 धावा केल्या. धावांचा पाठलाग करताना सेहवाग (0) आणि सचिन (18) ही जोडी झटपट बाद झाली. मात्र गंभीरने एक बाजू लावून धरत 97 धावांची खेळी केली आणि धोनीसोबत मिळून संघाला विश्वचषक जिंकून दिला. कुलशेखरा याच्या चेंडूवर धोनीने मारलेला विजयी षटकार आजही लोकांच्या लक्षात आहे.

आपली प्रतिक्रिया द्या