
सामना ऑनलाईन । राजकोट
हिंदुस्थान-वेस्ट इंडीजदरम्यानचा पहिला कसोटी क्रिकेट सामना आजपासून राजकोटच्या मैदानावर सुरू होणार आहे. उभय संघांमध्ये अर्थातच ‘टीम इंडिया’चे पारडे जड आहे. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ असल्याने विराट सेनेला ‘नंबर वन’चे सिंहासन शाबूत ठेवण्यासाठी मैदानावर आपल्या लौकिकास साजेशी कामगिरी करावी लागणार आहे. कारण धक्कादायक निकाल लागला तर ऑस्ट्रेलियन संघाला ‘टीम इंडिया’चे अव्वल स्थान काबीज करण्याची संधी मिळू शकते.
…तर ऑस्ट्रेलिया होणार ‘नंबर वन’
सध्या ‘टीम इंडिया’ 115 रेटिंग गुणांसह ‘आयसीसी’ क्रमवारीत अव्वल स्थानावर आहे. तिसऱया स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या खात्यात 106 गुण जमा आहेत. विंडीजचा संघ क्रमवारीत आठव्या स्थानी असल्याने हिंदुस्थानने 2-0 फरकाने मालिका जिंकली तरी त्यांना केवळ एकच रेटिंग गुण मिळणार आहे, मात्र हिंदुस्थानने मालिका 0-2 फरकाने गमाविल्यास त्यांच्या खात्यात 108 गुण राहतील. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका 2-0 फरकाने जिंकल्यास त्यांची गुणसंख्या 109 होईल व ते कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर येतील. रविवारपासून यूएईमध्ये ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान दरम्यानच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेला सुरुवात होणार आहे.
विराटच्या नेतृत्वाखाली मायदेशात केवळ एक पराभव
विराट कोहलीने 2015 मध्ये ‘टीम इंडिया’चे कर्णधारपद स्वीकारले तेव्हापासून हिंदुस्थानने मायदेशात 19 कसोटी सामने खेळले. त्यातील 13 सामने विराट सेनेने जिंकले, 5 सामने अनिर्णीत झाले, तर केवळ एक सामना गमावला. गतवर्षी फेब्रुवारीमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध हिंदुस्थानला पुण्यातील कसोटी सामन्यात 333 धावांनी पराभवाची नामुष्की पत्करावी लागली होती.
विंडीजच्या नवोदित संघाची ‘कसोटी’
हिंदुस्थानच्या खडतर दौऱयावर आलेल्या वेस्ट इंडीजच्या नवोदित संघाची कसोटी मालिकेत खरी कसोटी लागणार आहे. त्यांच्याकडे कर्णधार जेसन होल्डर वगळता इतर सर्व खेळाडू अननुभवी आहेत. केमार रोचच्या आजीचे निधन झाल्याने तोही पहिल्या कसोटीत खेळणार नसल्याने विंडीजचा पाय आणखी खोलात गेला आहे. क्रेग ब्रेथवेट व कायरॉन पॉवेल यांच्यावर विंडीजच्या फलंदाजीची मदार असेल. रोस्टन चेज, देवेंद्र बिशू व जोमेल वार्रिकन असे फिरकीपटू विंडीजच्या संघात आहेत. ‘नंबर वन’ टीम इंडियाला हा आठव्या स्थानावरील संघ कशी टक्कर देतो हे पाहणे रंजक ठरणार आहे.
24 वर्षांपासून विंडीजची पाटी कोरी
वेस्ट इंडीज संघाने 14 डिसेंबर 1994 मध्ये हिंदुस्थानविरुद्ध मोहाली कसोटीत अखेरचा विजय मिळवला होता. त्यानंतर हिंदुस्थानमध्ये तब्बल 24 वर्षांपासून विंडीजच्या विजयाची पाटी कोरी आहे. हिंदुस्थानी संघात असलेल्या कुलदीप यादवचा 14 डिसेंबर 1994 मध्येच जन्म झाला होता हे विशेष. शिवाय विंडीजने हिंदुस्थानात अखेरची कसोटी जिंकली तेव्हा विराट कोहली फक्त सहा वर्षांचा होता. रिषभ पंत व पृथ्वी शॉ यांचा तर त्यावेळी जन्मही झाला नव्हता. या 24 वर्षांत विंडीजने हिंदुस्थानात आठ कसोटी सामने खेळले. त्यात सहा कसोटी सामन्यांत त्यांना पराभव पत्करावा लागला, तर दोन सामने अनिर्णीत राहिले होते.

























































