आपल्या हद्दीत राहा! हिंदुस्थानने चीनला ठणकावले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

गलवान हिंसाचारानंतर प्रथमच हिंदुस्थान व चीनच्या संरक्षणमंत्र्यांची मॉस्कोत चर्चा झाली. यावेळी हिंदुस्थानने सीमेवर जवानांची संख्या वाढविणे हा कराराचा भंग असल्याचे स्पष्ट करून चीनने आपल्या हद्दीत राहावे, असे ठणकावले. तर दुसरीकडे चर्चा संपताच चीनने एक इंचही जागा सोडणार नाही, असे सांगत आपले शेपूट वाकडेच असल्याचे दाखवून दिले.

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह हे एका परिषदेच्या निमित्ताने रशियाच्या दौऱ्यावर आहेत. चीनचे संरक्षणमंत्री वे ई फेंगे हेदेखील या परिषदेत सहभागी होण्यासाठी आले आहेत. लडाख सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर राजनाथ सिंह यांनी चिनी मंत्र्यांशी कोणतीही चर्चा करण्यास नापसंती दाखविली होती. मात्र, फेंगे यांच्या आग्रहावरून शनिवारी उभय नेत्यांमध्ये तब्बल अडीच तास चर्चा झाली. या संपूर्ण चर्चेत सीमेवरील तणावावरच चर्चा झाली.

हिंदुस्थान सार्वभौमत्वाशी तडजोड करणार नाही
अनेक महिन्यांपासून चीनच्या युद्धखोरीमुळे लडाख सीमेवरील वातावरण अशांत बनले आहे. प्रत्यक्ष सीमेवर जवानांची संख्या वाढविणे हा दोन्ही देशांत झालेल्या द्विपक्षीय कराराचा भंग आहे, असे कडक शब्दांत सुनावत राजनाथ सिंह यांनी हिंदुस्थान आपल्या सार्वभौमत्वाशी
कदापि तडजोड करणार नाही. त्यामुळे चीनने आपल्या हद्दीत राहावे, असे त्यांनी ठणकावले.

चीनचा हेकटपणा कायम
चर्चेनंतर पत्रकारांशी बोलताना चीनचे संरक्षणमंत्री वे ई फेंगे यांनी हिंदुस्थानवर आगपाखड केली. हिंदुस्थानमुळेच लडाख सीमेवर अशांतता असल्याचा कांगावा करून त्यांनी आम्ही आमची एक इंचही जमीन सोडणार नाही, असे सांगितले.