हिंदुस्थान उद्या करणार कर्तारपूर करारावर स्वाक्षरी

444

हिंदुस्थानातील शीख यात्रेकरूंच्या धार्मिक भावनांचा विचार करत केंद्र सरकार अखेर कर्तारपूर कॉरिडोरबाबत 23 ऑक्टोबरला पाकिस्तानसोबत करारावर स्वाक्षरी करणार आहे. याचवेळी कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला जाणाऱया शीख यात्रेकरूंसाठी शुल्क माफ करा किंवा ते कमी करा, अशी समज पाकिस्तानला दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी 8 नोव्हेंबरला कर्तारपूर कॉरिडोर खुला करण्यासाठी डेरा बाबा नानकला जाणार आहेत, तर इम्रान खान 9 नोव्हेंबरला कॉरिडोरची पाकिस्तानकडील सीमा खुली करणार आहेत. पाकिस्तानने कर्तारपूर साहिब गुरुद्वाराला जाणाऱया प्रत्येक यात्रेकरूकडून 1420 रुपये शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर हिंदुस्थानने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच कारणावरून ऑनलाइन रजिस्ट्रेशनची प्रक्रिया रविवारी सुरू होऊ शकली नाही. यासंदर्भात परराष्ट्र मंत्रालयातील बैठकीनंतर हिंदुस्थान लवकरच पाकिस्तानातील अधिकाऱयांसोबत बैठक करणार आहे.

..तर पाकिस्तानला दरवर्षी मिळणार 259 कोटी रुपये

हिंदुस्थानातील प्रत्येक शीख यात्रेकरूकडून 1420 रुपये घेण्यावर पाकिस्तान ठाम आहे. कर्तारपूर साहिबला माथा टेकवण्यासाठी एका दिवसाला 5 हजार यात्रेकरूंना परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक वर्षी 18 लाख शीख यात्रेकरूंनी हजेरी लावल्यास त्यांच्याकडून पाकिस्तानला 259 कोटी रुपये मिळणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या