पोपटाचा ‘वाघ’ झाला! दुबळ्या विंडीजवर हिंदुस्थानचा सहज विजय

19

सामना ऑनलाईन । राजकोट

दक्षिण आफ्रिका व इंग्लंड दौऱयात ‘पोपट’ झालेल्या हिंदुस्थानी क्रिकेट संघाचा मायदेशात परतताच जणू ‘वाघ’ झाला. राजकोट येथील पहिल्या कसोटीत दुबळ्या वेस्ट इंडीजला हिंदुस्थानने एक डाव व 272 धावांनी धूळ चारली. अवघ्या तीन दिवसांतच वेस्ट इंडीजचा खेळ खल्लास करत मायदेशातील शंभरावा विजय साजरा केला. वेस्ट इंडीजला दोन्ही डाव मिळून 100 षटकेही खेळता आली नाहीत. त्यांचे 20 पैकी 14 फलंदाज तिसऱया दिवसाच्या दोन सत्रांत पॅव्हेलियनमध्ये परतले. हिंदुस्थानचा हा वेस्ट इंडीजवर मिळवलेला सर्वात मोठा विजय ठरला.

पृथ्वी शॉ, कर्णधार विराट कोहली, रवींद्र जाडेजा यांची खणखणीत शतके आणि चेतेश्वर पुजारा, रिषभ पंत यांची दमदार अर्धशतके याच जोरावर हिंदुस्थानने पहिल्या डावात 649 धावांचा डोंगर उभारला. वेस्ट इंडीजचा पहिला डाव 181 धावांमध्येच गडगडला. वेस्ट इंडीजवर फॉलोऑन लादला गेला. दुसऱया डावातही त्यांना आपला ठसा उमटवता आला नाही. नवख्या कुलदीप यादवच्या फिरकीच्या जाळय़ात त्यांचे फलंदाज अडकले. अखेर त्यांचा डाव 196 धावांमध्येच आटोपला.

हिंदुस्थानचा डाव व 272 धावांनी मिळवलेला हा सर्वात मोठा विजय ठरलाय. याआधी अफगाणिस्तानला डाव व 262 धावांनी हरवण्याची किमया टीम इंडियाने केली होती. कसोटी क्रिकेटमधील वेस्ट इंडीजचा हा सर्वात मोठा दुसरा पराभव ठरलाय. याआधी त्यांचा संघ इंग्लंडकडून 2007 साली एक डाव व 283 धावांनी पराभूत झाला होता. पहिल्याच सामन्यात सामनावीर ठरणारा पृथ्वी शॉ हा सहावा हिंदुस्थानी खेळाडू ठरलाय. याआधी अमरे, आर.पी. सिंग, अश्विन, धवन, रोहित या यादीत यांचा समावेश होता.

कसोटी, वन डे व ट्वेण्टी-20 या तिन्ही प्रकारांत एका डावात 5 बळी गारद करणारा कुलदीप यादव आंतरराष्ट्रीय स्तरावरील सातवाच गोलंदाज ठरलाय. कुलदीप यादव वगळता हिंदुस्थानच्या भुवनेश्वरकुमारलाच ही करामत करता आलीय. हिंदुस्थानने पहिल्या डावात 468 धावांची आघाडी घेतली. कसोटीच्या इतिहासातील हिंदुस्थानने घेतलेली ही सर्वात मोठी तिसरी आघाडी ठरलीय.

summary- india won first test match against west indies

आपली प्रतिक्रिया द्या