वानखेडेवर रोहित, लोकेश, विराटचे तुफान; निर्णायक लढतीत विंडीजचा धुव्वा

516

‘हिटमॅन’ रोहित शर्मा (71), ‘टी-20 फेम’ लोकेश राहुल (91) आणि ‘रनमशीन’ विराट कोहली (नाबाद 70)यांनी तुफानी फटकेबाजी करून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आलेल्या क्रिकेटशौकिनांची पैसा वसूल करमणूक केली. या त्रिकुटाच्या झंझावाती अर्धशतकांच्या जोरावर ‘टीम इंडिया’ने 3 बाद 240 धावांचे महाकाय आव्हान उभे केले. प्रत्युत्तरादाखल वेस्ट इंडीजला 67 धावांनी धूळ चारून हिंदुस्थानने तीन सामन्यांची मालिका 2-1 फरकाने जिंकली.

हिंदुस्थानकडून मिळालेल्या 241 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना विंडीजला 8 बाद 173 धावसंख्येपर्यंच मजल मारता आली. ब्रॅण्डॉन किंग (5), लेण्डल सिमोन्स (7) व निकोलस पूरन (0) ही आघाडीची फळी केवळ हजेरीवीर ठरल्याने विंडीजची फलंदाजी संकटात सापडली, मात्र  सिमरॉन हेटमायर (41) व कर्णधार कायरॉन पोलार्ड (68) यांनी काही वेळ फटकेबाजी केली, पण ते सामन्यात रंगत निर्माण करु शकले नाही.

त्याआधी हिंदुस्थानने 3 फलंदाजांच्या मोबदल्यात 240 धावांचा डोंगर उभारला. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल या जोडीने 135 धावांची खणखणीत सलामी देत विंडीजला सैरभैर केले. रोहितने 34 चेंडूंत 71 धावांची तडाखेबंद खेळी करताना 6 चौकारांसह 5 षटकारांचा घणाघात केला.

रोहित आता गेल, आफ्रिदीच्या क्लबमध्ये

रोहित शर्माने खॅरी पियरचा चेंडू मैदानाबाहेर भिरकावून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 400 षटकारांचा टप्पा गाठून ख्रिस गेल व शाहिद आफ्रिदी यांच्या क्लबमध्ये सहभागी होण्याचा मान मिळविला. मात्र आफ्रिदी आणि गेलने 400 षटकार ठोकण्यासाठी अनुक्रमे 437 व 486 डाव खेळले. रोहितने 360 डावांतच 400 षटकार ठोकण्याचा पराक्रम केलाय हे विशेष.

आपली प्रतिक्रिया द्या