ग्रीन पार्क हिंदुस्थानसाठी विक्टरी पार्क ठरले. अडीच दिवस पावसाने धुमशान घातल्यानंतर हिंदुस्थानी फलंदाजांनी केलेल्या टी-20 स्टाइल फटकेबाजीमुळे हिंदुस्थानने अवघ्या दोन दिवसांच्या खेळातच कसोटीचा निकाल लावला. रवींद्र जाडेजा आणि जसप्रीत बुमराच्या माऱ्यापुढे बांगलादेशचा दुसरा डाव अवघ्या 146 धावांत आटोपल्यावर हिंदुस्थानने 95 धावांचे विजयी लक्ष्य 17.2 षटकांत 3 फलंदाजांच्या मोबदल्यात गाठले आणि दुसरी कसोटी 7 विकेट राखून जिंकत मालिकाही 2-0 ने जिंकली. कानपूरमध्ये क्रिकेटप्रेमींना अनपेक्षितरीत्या टी-20 क्रिकेटची टेस्ट चाखायला मिळाली.
पहिल्या अडीचपेक्षा अधिक दिवसातील 235 षटकांचा खेळ वाया गेल्यामुळे ग्रीन पार्क अक्षरशः रेन पार्क ठरले होते. कसोटी अनिर्णितावस्थेकडे झुकली होती; पण चौथ्या दिवशी हिंदुस्थानी खेळाडूंचा खेळ तळपला आणि त्यांनी भन्नाट माऱ्यासह सुस्साट फलंदाजीचा विक्रमी नजराणा पेश करत अवघ्या 173.2 षटकांतच कसोटी संपवण्याचा अद्भुत पराक्रम केला. म्हणजेच 235 षटकांचा खेळ वाया गेल्यानंतरही 173.2 षटकांत कसोटी संपवली.
हिंदुस्थानी फलंदाजांनी ‘टी-20 स्टाइल’ खेळ करीत विक्रमांची केलेली तुफान फटकेबाजी पाहून अवघे क्रिकेट विश्व अचंबित झाले. प्रशिक्षक गौतम गंभीरचे प्लॅनिंग, कर्णधार रोहित शर्माचा माइंड गेम आणि खेळाडूंची योजनेनुसार मिळालेली साथ ही हिंदुस्थानच्या विजयाची प्रमुख वैशिष्टय़े ठरली. दोन्ही डावांत आक्रमक अर्धशतके ठोकणारा यशस्वी जैसवाल या कसोटीचा मानकरी ठरला, तर ‘मालिकावीरा’चा बहुमान अष्टपैलू कामगिरी करणाऱ्या रविचंद्रन अश्विनला (114 धावा अन् 11 बळी) मिळाला.
टीम इंडियाने बांगलादेशला पहिल्या डावात 233 धावांवर रोखले. पावसामुळे हिंदुस्थानला थेट चौथ्या दिवशी फलंदाजीची संधी मिळाली. कानपूर कसोटी अनिर्णीत राहण्याची चिन्हे स्पष्ट दिसत असताना हिंदुस्थानने 34.4 षटकांत 9 बाद 285 धावांची लयलूट करीत पहिला डाव घोषित केला. मग याच दिवशी बांगलादेशची दुसऱ्या डावात 2 बाद 26 अशी दुर्दशा करीत हिंदुस्थानच्या विजयाच्या आशा पल्लवित केल्या. मंगळवारी सकाळी बांगलादेशने पुढे खेळायला सुरुवात केली. मात्र, हिंदुस्थानच्या विविधतेने नटलेल्या गोलंदाजीपुढे बांगलादेशी फलंदाजांची दाणादाण उडाली. त्यांच्याकडून सलामीवीर शादमान इस्लाम (50) व मधल्या फळीत कर्णधार नजमुल हुसैन शांतो (19) व मुशफिकर रहिम (39) यांनीच काय तो हिंदुस्थानी गोलंदाजीचा काही वेळ प्रतिकार केला. इतर फलंदाज केवळ ‘हजेरीवीर’ ठरल्याने बांगलादेशचा डाव 47 षटकांत 146 धावांवरच गडगडला. हिंदुस्थानकडून जसप्रीत बुमराह, रविचंद्रन अश्विन व रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी तीन फलंदाज बाद केले, तर आकाश दीपला एक विकेट मिळाला. हिंदुस्थानला कसोटी विजयासाठी अवघ्या 95 धावा करायच्या होत्या. रोहित शर्मा (8) आणि शुभमन गिल (6) हे दोघे लवकर बाद झाले. पण यशस्वी जैसवालने आपल्या वेगवान फलंदाजीतले सातत्य कायम राखत 51 धावा ठोकत हिंदुस्थानला सुपरफास्ट विजयाची भेट दिली. हिंदुस्थानने 17.2 षटकांतच ऋषभ पंतच्या चौकाराने विजयी लक्ष्य गाठले.
कानपूर कसोटीत विक्रमच विक्रम
टीम इंडियाने मायदेशात सलग 18वी कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला. 2012मध्ये इंग्लंडविरुद्ध हिंदुस्थानने मायदेशात चार सामन्यांची कसोटी मालिका 2-1 फरकाने गमावली होती. हिंदुस्थानने बांगलादेशविरुद्ध आठव्यांदा कसोटी मालिका जिंकली. हिंदुस्थानने बांगलादेशला 13 कसोटी सामन्यांत हरविले असून, दोन कसोटी ड्रॉ झालेल्या आहेत. बांगलादेशला हिंदुस्थानविरुद्ध अद्यापि एकही कसोटी सामना जिंकता आलेला नाही.
वेगवान धावांचा विक्रम
हिंदुस्थानने पहिल्या डावात तीन षटकांत 50 धावा व 10.1 षटकांत 100 धावा पूर्ण केल्या. कसोटीच्या 147 वर्षांच्या इतिहासातील हे सर्वांत वेगवान अर्धशतक आणि शतक ठरले. इतकेच नव्हे तर, सर्वांत जलद 150, 200 आणि 250 धावा करण्याचा विक्रमही हिंदुस्थानने याच डावात केला हे विशेष!
अश्विनची मुरलीधरनशी बरोबरी
रविचंद्रन अश्विनने कारकिर्दीत 11व्यांदा ‘मालिकावीर’चा बहुमान पटकावत श्रीलंकेच्या मुथय्या मुरलीधरनशी बरोबरी केली. मुरलीधरन निवृत्त झालेला असल्याने अश्विनकडे त्याला मागे टाकण्याची सुवर्णसंधी आहे.
कसोटी विजयात द. आफ्रिकेला पछाडले
हिंदुस्थानच्या नावावर आता 180 कसोटी विजय झाले असून, त्यांनी याबाबतीत दक्षिण आफ्रिकेला (179 विजय) मागे टाकले आहे. सर्वाधिक कसोटी विजयात आता हिंदुस्थान चौथ्या स्थानावर असून, यामध्ये ऑस्ट्रेलिया (414), इंग्लंड (397) व वेस्ट इंडिज (183) अनुक्रमे पहिल्या तीन स्थानांवर आहेत.
21व्या शतकातील ऐतिहासिक कसोटी
21व्या शतकात 50 षटकांपूर्वीच पहिला डाव घोषित करणारा हिंदुस्थान हा पहिलाच देश ठरला आहे. गेल्या 70 वर्षांत ही दुसरी वेळ आहे, जेव्हा एखाद्या संघाने आपला पहिला डाव 35 षटकांपूर्वी घोषित केला आहे. 2000मध्ये इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या सामन्यातही असाच प्रकार पाहायला मिळाला होता. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार हॅन्सी क्रोनिएने डाव घोषित करून सर्वांनाच चकित केले होते. मात्र, हॅन्सी क्रोनिएने नंतर या सामन्याबाबत मॅच फिक्सिंगचे सर्व आरोप मान्य केले होते.
नंबर वनचे सिंहासन कायम
हिंदुस्थानने बांगलादेशविरुद्धच्या दोन सामन्यांत निर्भेळ यश मिळवीत जागतिक कसोटी क्रिकेट अजिंक्यपद स्पर्धेतील ‘नंबर वन’चे सिंहासन आणखी मजबूत केले. कानपूर कसोटीपूर्वी टीम इंडियाची गुणांची टक्केवारी 71.67 होती, ती आता 74.24 वर पोहोचली आहे. दुसऱ्या स्थानावर असलेल्या ऑस्ट्रेलियाच्या गुणांची टक्केवारी केवळ 62.50 आहे. तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या श्रीलंकेच्या विजयाची टक्केवारी 55.56 आहे. इंग्लंडचा संघ चौथ्या क्रमांकावर असून, त्यांची विजयाची टक्केवारी 42.19 आहे.