
हिंदुस्थानी हवाई दलाच्या चाबुआ तळावर कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याला लष्करी गोपनीय माहिती पाकिस्तानला पुरवल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. राजस्थान इंटेलिजन्स आणि एअर फोर्स इंटेलिजन्स यांनी संयुक्तपणे ही मोठी कारवाई केली. जैसलमेरमधून जानेवारी 2026 मध्ये अटक करण्यात आलेल्या झबरा राम नावाच्या व्यक्तीच्या चौकशीतून एका नवीन गुन्हेगाराचे नाव समोर आले आणि या देशव्यापी हेरगिरीच्या जाळ्याचा पर्दाफाश झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमित कुमार असे त्याचे नाव असून तो मूळचा उत्तर प्रदेशातील प्रयागराजचा आहे. मात्र सध्या तो आसाममधील दिब्रुगड जिल्ह्यातील चाबुआ एअर फोर्स स्टेशनवर तैनात होता. सुमित कुमार 2023 पासून पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांच्या संपर्कात असल्याचे तपसात समोर आले आहे. पैशांच्या मोबदल्यात त्याने हवाई दलाच्या चाबुआ आणि नाल (राजस्थान) यांसारख्या महत्त्वाच्या तळांची गोपनीय माहिती शत्रू राष्ट्राला पुरवली. यामध्ये लढाऊ विमानांची ठिकाणे, क्षेपणास्त्र यंत्रणांची (Missile Systems) तैनात स्थिती आणि तळावरील कर्मचाऱ्यांची वैयक्तिक माहिती अशा संवेदनशील तपशिलांचा समावेश होता. या माहितीमुळे देशाच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
सुमितने माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर केला होता. इतकेच नव्हे तर, त्याने स्वतःच्या नावावर नोंदणीकृत असलेल्या मोबाइल क्रमांकांचा वापर करून पाकिस्तानी हँडलर्सना सोशल मीडिया खाती उघडण्यास मदत केली होती. या तांत्रिक पुराव्यांच्या आधारे तपास यंत्रणांनी त्याच्यावर पाळत ठेवली होती. सुमितला 22 मार्च रोजी जयपूरमध्ये आणल्यानंतर आसाममध्ये अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून अधिक माहिती मिळवण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.
या प्रकरणी जयपूरमधील विशेष पोलीस ठाण्यात ‘ऑफिशियल सिक्रेट्स ॲक्ट, 1923’ आणि ‘भारतीय न्याय संहिता (BNS), 2023’ च्या विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अटकेमुळे पाकिस्तानातून चालवल्या जाणाऱ्या एका मोठ्या हेरगिरीच्या नेटवर्कचा उलगडा झाला असून, यामध्ये आणखी काही हिंदुस्थानी नागरिक सामील असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. पुढील तपासात या जाळ्यातील इतर पुराव्यांचा शोध तपास यंत्रणा करत आहेत.






















































