हिंदुस्थानी तिरंदाजांच्या मार्गात पाकिस्तानचा ‘हवाई’ अडथळा, संघ विश्वचषकाला मुकला

सामना प्रतिनिधी ।  नवी दिल्ली

हिंदुस्थानच्या हवाई दलाने पाकिस्तानातील बालाकोटमध्ये एअर स्ट्राइक केल्यानंतर पाकिस्तानने आपली हवाई हद्द हिंदुस्थानी विमानांसाठी बंद केली आहे. याचा मोठा फटका हिंदुस्थानच्या तिरंदाजांना बसला आहे. पाकिस्तानने आपली हवाई हद्द हिंदुस्थानी विमानांसाठी बंद केल्यामुळे हिंदुस्थानी खेळाडूंचे विमान वेळेत उड्डाण करू न शकल्याने कोलंबियात होणार्‍या विश्वचषक स्पर्धेला हिंदुस्थानी तिरंदाज मुकले आहेत. काही दिवसांपूर्की हे हवाई हद्द बंदचे निर्बंध काही प्रमाणात शिथिल करण्यात आले होते, मात्र अजूनही ही बंदी पूर्णपणे उठवण्यात आलेली नाही. दीपिका कुमारी, बोम्बायला देवी, अतानू दास, तरुणदीप राय, अभिषेक कर्मा यांसारख्या दिग्गज खेळाडूंसह 23 हिंदुस्थानी खेळाडूंचा संघ या स्पर्धेत सहभागी होणार होता. दिल्ली-ऍमस्टरडॅम-बोगोटा हा प्रकासाचा पहिला टप्पा होता. यानंतर बोगोटाकरून कोलंबियातील मेडेलीन शहरात जाण्यासाठी दुसर्‍या विमानाचे बुकिंग करण्यात आले होते.

स्पर्धेसाठी हिंदुस्थानी खेळाडू दिल्लीच्या विमानतळावर येताच त्यांना विमान कंपनीच्या अधिकार्‍यांनी पाकिस्तानातील हवाई हद्द बंद असल्यामुळे विमान दोन तास उशिरा असल्याचे सांगितले. खेळाडूंनी तिरंदाजी संघटनेच्या अधिकार्‍यांना याविषयी माहिती दिली. संघटनेने खेळाडूंसाठी दुसर्‍या मार्गाची तिकिटे बुक करण्याचा प्रयत्न केला, मात्र इतर विमानांमध्ये जागा उपलब्ध नसल्यामुळे अखेरीस तिरंदाजी संघटनेला नाइलाजाने हिंदुस्थानी खेळाडूंना माघारी बोलवावे लागले.