कोरोना योद्ध्यांना हिंदुस्थानी सैन्य दलांचा सलाम! लढाऊ विमानांतून देशभरात पुष्पवृष्टी

1452

कोरोनासारख्या अदृश्य शत्रुने आज जगभरात थैमान घातलं आहे. त्याला परतवून लावण्यासाठी आणि एकेका जीवाच्या रक्षणासाठी अहोरात्र सेवा देणाऱ्या कोरोना योद्ध्यांना आज सगळा देश सलाम देत आहे. हिंदुस्थानच्या सीमांवर शत्रुचा बिमोड करणाऱ्या देशाच्या तिन्ही सैन्य दलांकडून या कोरोना योद्धांना एक खास मानवंदना देण्यात येत आहे. देशभरात सेवा देणारे डॉक्टर्स, वैद्यकीय कर्मचारी, पोलीस, सफाई कर्मचारी यांचा या कोविड योद्ध्यांमध्ये समावेश आहे.

हिंदुस्थानी सैन्य दलांच्या लढाऊ आणि मालवाहतूक करणाऱ्या विमानांमधून देशभरात पुष्पवृष्टी केली जात आहे. दिल्ली येथील पोलीस युद्ध स्मृतीस्थळापासून याची सुरुवात झाली असून पहिली फ्लाय पास्ट श्रीनगर ते त्रिवेंद्रम असून दुसरी फ्लाय पास्ट दिब्रुगढ ते कच्छ अशी आहे. हा सलाम हिंदुस्थानी हवाई दलाकडून असेल तर नौसेनेची लढाऊ विमानं दुपारी तीन नंतर प्रकाश किरणांची सलामी देतील. तसंच भूदल जिल्ह्यांमधील कोविड रुग्णालयांमध्ये माउंटन बँड पथकाची सलामी देईल.

या सलामीची घोषणा शनिवारी लष्कर प्रमुख बिपिन रावत यांनी केली होती. रविवारी दहा वाजता नियोजित असलेल्या या कार्यक्रमाला पावसाच्या व्यत्ययामुळे एक तास पुढे ढकलण्यात आलं. ज्या शहरांमध्ये हवाई दलाच्या लढाऊ विमानांकडून सलामी देण्यात येणार आहे त्या शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, जयपुर, अहमदाबाद, गुवाहाटी, पाटणा आणि लखनऊचा समावेश आहे. तर श्रीनगर, चंदीगड, भोपाळ, हैदराबाद, बेंगळुरू, कोईम्बतूर और तिरुवनंतपुरम या शहरांवर हवाई दलाची मालवाहतूक करणारी विमाने पुष्पवृष्टी करतील.

आपली प्रतिक्रिया द्या