लष्कराचे हेलिकॉप्टर भूतानमध्ये कोसळले; दोन वैमानिक शहीद

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदुस्थानी लष्कराचे ‘चिता’ हेलिकॉप्टर शुक्रवारी भूतानमध्ये कोसळले. या दुर्घटनेत दोन वैमानिक शहीद झाले. हेलिकॉप्टरने अरुणाचल प्रदेशातील खिरमू येथून भूतानमधील योंगफुल्लाच्या दिशेने उड्डाण घेतले होते. दुपारी एकच्या सुमारास हेलिकॉप्टरचा अचानक संपर्क तुटला आणि ही दुर्घटना घडली.

शहीद झालेल्या वैमानिकांमध्ये हिंदुस्थानचे लेफ्टनंट कर्नल रजनीश परमार यांचा समावेश आहे, तर दुसरे वैमानिक कॅप्टन कालजाम वांगडी हे भूतानचे असून ते हिंदुस्थानी लष्करासमवेत प्रशिक्षण घेत होते. परमार यांचा शुक्रवारी वाढदिवस होता. दुपारी एकच्या सुमारास हेलिकॉप्टर भूतानमध्ये कोसळल्याची माहिती मिळाली. त्यानंतर लष्कराने तातडीने शोधमोहीम व बचाव कार्य सुरू केले. दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरचे अवशेष हाती लागले आहेत.

मुदतबाह्य होऊनही हेलिकॉप्टर होते सेवेत

80 च्या दशकापासून वापरात असलेल्या ‘चिता’ हेलिकॉप्टरला ‘डेथ ट्रप’ म्हटले जायचे. ते सेवेतून हटवण्याची मागणी अनेक वर्षांपासून लष्कराचे अधिकारी करीत होते. मात्र त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेल्याने अखेर शुक्रवारी दुर्घटना घडली. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचा आदेश देण्यात आला आहे.