
हिंदुस्थानी लष्कराने आपल्या सोशल मीडिया वापराच्या धोरणात महत्त्वाचा बदल केला आहे. यानुसार आता लष्करातील जवान आणि अधिकारी यांना इन्स्टाग्रामचा वापर करता येईल, पण केवळ देखरेखीसाठी आणि बघण्यासाठीच ते इन्स्टाग्राम वापरू शकतील. महत्त्वाचे म्हणजे त्यांना कुठल्याही पोस्टवर ‘लाईक’ करता येणार नाही, कमेंट करता येणार नाही, तसेच ते कोणती पोस्टदेखील अपलोड करू शकणार नाहीत.
सोशल मीडिया वापराबाबतचे हे नवे निर्देश लष्कराच्या सर्व युनिट्स आणि विभागांना जारी करण्यात आले आहेत. या बदलामागील मुख्य उद्देश म्हणजे जवानांना सोशल मीडियावर प्रसिद्ध होणारी माहिती पाहता यावी आणि तिच्यावर लक्ष ठेवता यावे. एखादी फसवी, भ्रामक किंवा संशयास्पद पोस्ट आढळल्यास त्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱयांपर्यंत पोहोचवता यावी, हा यामागचा हेतू आहे. यामुळे अफवा, दिशाभूल करणारी माहिती किंवा शत्रू देशांकडून चालवले जाणारे प्रचार प्रयत्न ओळखण्यास मदत होणार आहे.
सुरक्षेच्या कारणांमुळे हिंदुस्थानी सेना वेळोवेळी फेसबुक, एक्स, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या वापरावर निर्बंध आणत आली आहे. काही प्रकरणांमध्ये जवान परदेशी गुप्तचर संस्थांच्या हनी ट्रपमध्ये अडकल्याने संवेदनशील माहिती नकळत लीक झाल्याचे प्रकार समोर आले होते. त्यामुळेच हे नियम अधिक कडक करण्यात आले होते.
लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या ‘चाणक्य डिफेन्स डायलॉग’मध्ये या नियमांचा उल्लेख केला होता. आजची ‘जेनरेशन झेड’ लष्करात सामील होत असताना स्मार्टफोन ही त्यांची मोठी गरज बनली असल्याचे त्यांनी मान्य केले. एनडीएमध्ये येणाऱया कॅडेट्सना फोनशिवायही जगता येते, हे पटवून देण्यासाठी तीन ते सहा महिने लागतात, असेही त्यांनी या वेळी सांगितले.




























































