शुभांशू शुक्ला यांचे अंतराळ मिशन 10 जूनपर्यंत लांबणीवर

भारतीय अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला यांचे अंतराळ मिशन पुन्हा एकदा लांबणीवर पडले आहे. हे मिशन आता 10 जून रोजी लाँच केले जाणार आहे. हे मिशन एक्सिओम स्पेसच्या एएक्स-4 च्या कार्यक्रमाचा भाग आहे. पूर्व उड्डाण क्वॉरंटीन प्रक्रिया पूर्ण झाली नसल्याने हे उड्डाण लांबणीवर टाकण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. या मिशनला सर्वात आधी 29 मे रोजी लाँच केले जाणार होते, परंतु ते पुढे ढकलण्यात आले. आता क्वॉरंटीन प्रक्रियेमुळे हे मिशन 10 जूनपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. या मिशनमध्ये शुभांशू शुक्ला हे पायलट म्हणून अंतराळात जाणार आहेत. तसेच आयएसएसचा दौरा करणारे पहिले हिंदुस्थान ठरणार असून अंतराळात जाणारे दुसरे हिंदुस्थानी ठरणार आहेत. याआधी हिंदुस्थानी अंतराळवीर राकेश शर्मा गेले होते. 14 दिवसांच्या मिशनमध्ये शुभांशू शुक्ला यांच्यासोबत पोलंडचे स्लावोस उजनान्सकी आणि हंगरीचे टिबोर काप यांचा समावेश आहे. हे दोघेही देशांसाठी पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय अंतराळ स्टेशनवर जात आहेत. संपूर्ण टीमची जबाबदारी अमेरिकन अंतराळवीर पेगी व्हिटसन यांच्याकडे असणार आहे. हे मिशन केवळ हिंदुस्थानसाठी नव्हे तर युरोपसाठी ऐतिहासिक असणार आहे. या मिशनदरम्यान एकूण 60 वैज्ञानिक प्रयोग करतील. यात 31 देशांचे प्रतिनिधित्व करत आहेत. या मिशनचा सर्वात जास्त फायदा 2027 साली होणाऱया हिंदुस्थानच्या गगनयान मिशनसाठी होऊ शकतो. या मिशनवर हिंदुस्थान सरकारकडून 550 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.