मोठी बातमी – एकाच दिवशी 2 खेळाडूंचा क्रिकेटला रामराम, 2 वर्ल्डकप गाजवलेला…

टीम इंडियाच्या दोन खेळाडूंनी आज एकाच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. माजी वेगवान गोलंदाज विनय कुमार याने क्रिकेटला रामराम करण्यात असल्याचे जाहीर केल्यानंतर काही वेळाने अष्टपैलू खेळाडू युसुफ पठाण यानेही क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्तीची घोषणा केली.

युसुफ पठाण याने सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट आणि फोटो शेअर करून क्रिकेटच्या सर्व फॉर्मेटमधून निवृत्ती घेत असल्याचे जाहीर केले. टीम इंडियासाठी 57 एक दिवसीय आणि 22 आंतरराष्ट्रीय टी-20 सामने खेळलेल्या युसुफ पठाणने कुटुंबीय, मित्र, चाहते, संघ, प्रशिक्षक आणि संपूर्ण देशाला दिलेल्या पाठिंब्यासाठी सह्रदय धन्यवाद म्हटले आहे.

दोन वर्ल्डकपवर कोरले नाव

युसुफ पठाण याने 2007 ला झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या लढतीद्वारे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. पदार्पणाच्या लढतीत तो 15 धावांवर बाद झाला होता. मात्र याच वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव करत त्यावर आपले नाव कोरले होते. तसेच 2011 ला हिंदुस्थानने घरच्या मैदानात वन डे वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळी युसुफ पठाण टीम इंडियाचा सदस्य होता.

अनेक वर्षांपासून संघाबाहेर

दरम्यान, युसुफ पठाण गेल्या अनेक वर्षांपासून टीम इंडियाबाहेर आहे. 2012 ला तो आपला अखेरचा एक दिवसीय आणि टी-20 सामना खेळला होता. मात्र आयपीएलमध्ये तो आपली चमक दाखवत होता. परंतु यंदा एकाही संघाने त्याच्यात रस दाखवला नाही. गेल्या वर्षीही तो आयपीएलचा भाग नव्हता, त्यामुळे अखेर त्याने निवृत्ती जाहीर केली.

आंतरराष्ट्रीय कारकीर्द

युसुफ पठाणने टीम इंडियाकडून 57 एक दिवसीय सामने खेळले. यात त्याने 810 धावा केल्या, तसेच 33 बळीही घेतले. तसेच 22 आंतरराष्ट्रीय टी-20 लढतीत त्याच्या नावावर 236 धावा आणि 13 बळींची नोंद आहे.

आयपीएल गाजवले

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विशेष चमक दाखवू न शकलेल्या युसुफ पठाणने आयपीएल गाजवले. 2008 ते 2019 असा सलग तो आयपीएल खेळला. 2010 च्या सीझनमध्येत्याने मुंबई इंडियन्सविरुद्ध 37 चेंडूत शतक ठोकले होते. आयपीएलमधील हे दुसरे सर्वात वेगवान शतक आहे. आयपीएलच्या 174 लढतीत त्याच्या नावावर 3204 धावांची नोंद आहे, तर 42 बळीही त्याने घेतले आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या