
पाकिस्तानातील कराची कारागृहात बंद असलेल्या एका हिंदुस्थानी मच्छीमाराचा मृत्यू झाला आहे. भागाभाई बामनिया असे या मृत्यू झालेल्या मच्छीमाराचे नाव आहे. ते गुजरातमधील गिर सोमनाथ जिह्यातील चिखली गावाचे रहिवासी होते. मच्छीमार भागा भाई बामनिया अचानक आजारी पडले होते. त्यानंतर त्यांना उपचारासाठी पाकिस्तानातील रुग्णालयात पाठवण्यात आले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. पाकिस्तानी कारागृह हिंदुस्थानी मच्छीमारांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहेत. कारागृह आणि रुग्णालयांमध्ये मच्छीमारांना वैद्यकीय सुविधा वेळेवर मिळत नसल्याने अनेक मच्छीमारांनी पाकिस्तानी कारागृह आणि रुग्णालयामध्ये जीव गमावले आहेत. जवळजवळ 200 हिंदुस्थानी मच्छीमार अजूनही पाकिस्तानी कारागृहात आहेत.























































