चीनवर डिजिटल स्ट्राईक! टिकटॉक बंद, हिंदुस्थान सरकारची 59 चिनी ऍप्सवर बंदी

1002
tiktok-f

लडाख सीमेवर चिनी माकडांच्या कुरापती सुरूच आहेत. चिनी सैन्याने विश्वासघाताने हिंदुस्थानच्या 20 जवानांचे प्राण घेतले. त्यानंतर हिंदुस्थान आणि चीन देशांत कमालीचे तणावपूर्ण आणि संघर्षमय वातावरण तयार झाले आहे. शांततेच्या बैठका झाल्या तरी चीनच्या हालचाली सुरूच आहेत. म्हणूनच सोमवारी हिंदुस्थान सरकारने चीनला जोरदार झटका दिला आणि ‘टिकटॉक’सह अनेक अॅप्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले.

कोटय़वधी हिंदुस्थानींच्या मोबाईल पह्नमध्ये घुसखोरी केलेले ‘टिकटॉक’ अखेर बंद झाले. केंद्र सरकारने 59 चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. मोबाईलबरोबरच इंटरनेट असलेल्या इतर कोणत्याही डिव्हाईसवर टिकटॉक पाहता येणार नाही.

टिकटॉकने थोडय़ाच अवधीमध्ये हिंदुस्थानातील कोटय़वधी मोबाईल धारकांवर मोहिनी घातली होती. फुकटात प्रसिद्धीच्या हव्यासापोटी का होईना पण अनेक सेलिब्रिटींनाही त्याची भुरळ पडली होती. मात्र मनोरंजन करता-करता या अॅपने त्याची नियंत्रण रेषा ओलांडली होती. त्याद्वारे ग्राहकांची खासगी डाटा चोरला जातो अशा अनेकांच्या तक्रारी होत्या. टिकटॉकचा वापर समाजात द्वेष पसरवण्यासाठीही होऊ लागला होता.

केंद्रीय माहिती तंत्रज्ञान विभागाच्या काॅम्प्युटर इमर्जेन्सी रिस्पॉन्स टीमकडे त्यासंदर्भात अनेक नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या. त्याची दखल घेऊन माहिती तंत्रज्ञान अधिनियम कलम 69 (अ) अन्वये सरकारने बंदीची कारवाई केली.

टिकटॉकसह बंदी घातलेल्या चीनी अॅप्समध्ये शेअरइट, हेलो, क्लब फॅक्टरी, व्हायरस क्लीनर, वुई चॅट, एमआय कम्युनिटी, वॉल्ट, हॅगो प्ले, विगो व्हिडियो आदी अॅप्सचा समावेश आहे.

आपली प्रतिक्रिया द्या