हिंदुस्थानने ब्रिटनचा 6-4 असा धुव्वा उडवत ‘सुलतान ऑफ जोहोर चषक हॉकी स्पर्धेतील’ विजयी घोडदौड कायम राखली आहे. हिंदुस्थानच्या दिलराज सिंग आणि शारदा नंद तिवारी यांनी केलेल्या प्रत्येकी दोन गोलच्या जोरावर हिंदुस्थानने ब्रिटनच्या हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावून घेतला.
हिंदुस्थानने शनिवारी जपानला पराभवाची धूळ चारून मोहिमेची दमदार सुरुवात केली होती. तीच लय कायम ठेवत ब्रिटनलाही पराभवाचा धक्का दिला. सामन्याच्या सुरुवातीला ब्रिटननेच पहिला गोल करत आघाडी घेतली. खेळाच्या दुसऱ्याच मिनिटाला पेनरोजने पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर केले, मात्र काही वेळातच दादाच्या पेनल्टी कॉर्नरच्या गोलने हिंदुस्थानने बरोबरी साधली. 15 व्या मिनिटाला पेनरोजने आणखी एक गोल करून ब्रिटनने आघाडी मिळवली, मात्र हिंदुस्थानने दुसऱ्या क्वार्टरमध्ये वर्चस्व राखले आणि सलग तीन गोल केले. दिलराजने 17व्या मिनिटाला गोल करून स्कोअर 2-2 असा बरोबरीत आणला. यानंतर शारदाने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आघाडी मिळवून दिली.
ब्रिटनने चौथ्या क्वार्टरच्या सुरुवातीला रॉयडनच्या गोलच्या जोरावर पुनरागमन करण्याचा प्रयत्न केला. 50 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नरचे गोलमध्ये रूपांतर करत आघाडी भक्कम केली. त्यानंतर दिलराजने गोल करत स्कोअर 6-3 असा केला.