
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या संशयावरून हिंदुस्थानातील तपास यंत्रणांनी तब्बल 12 जणांना ताब्यात घेतले आहे. यात यूटय़ूबर ज्योती मल्होत्राचाही समावेश आहे. पंजाब, हरयाणा आणि उत्तर प्रदेशात कारवाई करत पोलिसांनी त्यांची धरपकड केली. ब्लॉगर, विद्यार्थी, व्यावसायिक, सिक्युरिटी गार्ड यांचा ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये समावेश आहे. गेल्या दोन आठवडय़ांत ही कारवाई करण्यात आली. सहा जणांना पंजाब येथून तर चार जणांना हरयाणा येथून अटक करण्यात आली. अटक करण्यात आलेल्यांमध्ये दोन महिलांचा समावेश आहे. यात यूटय़ूबर ज्योती मल्होत्राचा समावेश आहे. नवी दिल्लीतील पाकिस्तानी दूतावासातील पाकिस्तानी अधिकारी एहसान उर रहमान ऊर्फ दानीश याच्या ती संपका&त होती, असा ज्योतीवर आरोप आहे.
हेरगिरीचा संशय असलेल्यांबद्दलची माहिती उघड
25 वर्षीय दवेंदर सिंग ढिल्लन हा पटियालातील खालसा महाविद्यालयातील विद्यार्थी आहे. 12 मे रोजी हरयाणाच्या पैथालमध्ये फेसबुकवर पिस्तूल आणि बंदुकीचे पह्टो अपलोड केल्याप्रकरणी त्याला अटक करण्यात आली. तो गेल्या नोव्हेंबरमध्ये पाकिस्तानात गेला होता. त्याचा पटियाला मिलीटरी छावणीतील पह्टोही समोर आला आहे.
हरयाणात सुरक्षा रक्षक म्हणून काम करणाऱ्या 24 वर्षीय नौमन इलाही याला काहीदिवसांपूर्वी पानिपत येऊन ताब्यात घेण्यात आले. पाकिस्तानला माहिती पुरवण्यासाठी उत्तर प्रदेशातील रहिवाशाला त्याच्या मेहुण्याच्या बँक खात्यामार्फत पैसे मिळत होते.
16 मे रोजी हरयाणाच्या नूंह येथे केलेल्या कारवाईत 23 वर्षीय अरमानला अटक करण्यात आली. हिंदुस्थान आणि पाकिस्तानातील तणावादरम्यान पाकिस्तानला संवेदनशील माहिती पुरवल्याचा त्याच्यावर आरोप आहे.
गुजरात पोलिसांनी जालंधरमध्ये टाकलेल्या छाप्यादरम्यान मोहम्मद मुर्तजा अली याला अटक करण्यात आली. पाकिस्तानच्या आयएसआयसाठी हेरगिरी केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याच्यासोबतच गझाला आणि यामिन मोहम्मद यांनाही पंजाबमधून अटक करण्यात आली.
ज्योती मल्होत्रा एनआयएच्या ताब्यात
एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेने यूटय़ूबर ज्योती मल्होत्राला हिसार येथे जाऊन ताब्यात घेतले. सध्या तिला चंदिगडमध्ये नेण्यात आले असून पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी तिची कसून चौकशी केली जाणार आहे. तसेच जम्मूतील गुप्तचर यंत्रणाही तिची चौकशी करणार आहेत. याआधी ज्योती मल्होत्राचे इन्स्टाग्राम अकाऊंट बंद करण्यात आले आहे. तीचे 1.39 मिलियन्स फॉलोव्हर्स होते. 18 मे रोजी हिसार पोलिसांनी तिला अटक केली.