चीनसाठी हेरगिरी करणाऱया पत्रकाराला अटक, एका खबरीसाठी मिळायचे एक हजार डॉलर्स

चीनसाठी हेरगिरी केल्याबद्दल फ्रीलान्स पत्रकार राजीव शर्मा याला दिल्ली पोलिसांनी अटक केली. चौकशीत त्याचे कारनामे उघड होत आहेत. हिंदुस्थान-चीन सीमेवरील हालचालींसंदर्भात तो चीनला गुप्त माहिती पुरवत होता. एका खबरीसाठी त्याला चीनकडून एक हजार डॉलर्स म्हणजेच सुमारे सत्तर हजार रुपये मिळायचे.

दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेचे उपायुक्त संजीव कुमार यांनी ही माहिती दिली. शर्मा याने 2016 ते 2018 या कालावधीत चिनी हेरखात्याच्या अधिकाऱयांना गोपनीय माहिती पुरवली होती. अनेक देशांमध्ये जाऊन शर्माने या चिनी अधिकाऱयांची भेट घेतली होती. सीमेवरील लष्कराची तैनाती आणि हिंदुस्थान सरकार सीमेवरील सुरक्षेसाठी घेत असलेले निर्णय याची माहिती शर्माकडून चीनी अधिकाऱयांना मिळत होती.

तीन वर्षांत मिळाले 45 लाख

राजीव शर्मा याला प्रत्येक माहितीच्या बदल्यात एक हजार डॉलर्स चीनकडून मिळत होते. तीन वर्षांत त्याला 45 लाख रुपये मिळाल्याचे उघड झाले आहे. शर्मा हा गेली चाळीस वर्षे फ्रीलान्स पत्रकारिता करत असून देशातील अनेक मीडिया संस्थांसाठी तो काम करत होता. याशिवाय चीनमधील ‘ग्लोबल टाइम्स’ या दैनिकामध्येही तो संरक्षण या विषयाकर लिखाण करत होता. केंद्रीय गुप्तचर खात्याच्या सूचनेवरून दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याजवळ संरक्षण मंत्रालयाची गोपनीय कागदपत्रे सापडली.

आपली प्रतिक्रिया द्या