
पहलगाम हल्ल्यानंतरच नौदल युद्ध तयारीसह समुद्रात उतरले होते, अशी माहिती व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद यांनी दिली. रविवारी हिंदुस्थानच्या तिन्ही सैन्यदलांच्या प्रमुखांनी हिंदुस्थानी पत्रकार परिषद घेऊन ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि त्यानंतर सीमेवर घडलेल्या घडामोडींची सविस्तर माहिती दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी ही माहिती दिली.
यावेळी व्हाइस अॅडमिरल ए एन प्रमोद म्हणाले की, “22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांनी निष्पाप पर्यटकांवर केलेल्या भ्याड हल्ल्यांनंतर हिंदुस्थानी नौदलाचे वाहक युद्ध गट, भूपृष्ठ दल, पाणबुड्या तात्काळ पूर्ण युद्धसज्जतेत समुद्रात तैनात करण्यात आल्या. दहशतवादी हल्ल्याच्या 96 तासांच्या आत अरबी समुद्रात अनेक शस्त्रांचा वापर करून आम्ही समुद्रात रणनीती आणि प्रक्रियांची चाचणी घेतली. तसेच त्यात सुधारणा केल्या.
ते म्हणाले, “आपले सैन्य उत्तर अरबी समुद्रात निर्णायक आणि प्रतिबंधात्मक स्थितीत तैनात आहे. ठराविक वेळी कराचीसह समुद्रात आणि जमिनीवर निवडक लक्ष्यांवर हल्ला करण्यासाठी आमची पूर्ण तयारी आणि क्षमता आहे.”