
जम्मू-कश्मीरमधील कुपवाडा जिल्ह्यातील केरण सेक्टरमध्ये हिंदुस्थान आणि पाकिस्तानचे सैन्य समोरासमोर आल्याने तणाव निर्माण झाला आहे. केरण सेक्टरमध्ये 20 आणि 21 जानेवारीच्या दरम्यान रात्री गोळीबाराची घटना घडल्याचे समोर आले आहे. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरील ब्लाइंड स्पॉट्स नष्ट करण्यासाठी हिंदुस्थानी लष्कराचे जवान अत्याधुनिक कॅमेरे लावत असताना पाकड्यांनी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार केला. याला हिंदुस्थानी जवानांनीही चोख प्रत्युत्तर दिले.
पाकिस्तानकडून होणारी घुसखोरी रोखण्यासाठी हिंदुस्थानी लष्कर डोळ्यात तेल घालून सीमेवर पहारा देत असते. मात्र काही भागात ‘ब्लाइंड स्पॉट’ असल्याने तिथून घुसखोरी होण्याची शक्यता जास्त असते. हेच ब्लाइंड स्पॉट नष्ट करण्यासाटी 6 राष्ट्रीय रायफल्सचे जवान केरण बाला सेक्टरमध्ये अत्याधुनिक कॅमेरे बसवत होते. हे काम सुरू असताना पाकड्यांनी नेहमीप्रमाणे अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि दोन राऊंड फायर केले. हिंदुस्थानी लष्कराने पाकड्यांना सडेतोड प्रत्युत्तर दिले. या गोळीबारात दोन्ही बाजूंकडून कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ‘हिंदुस्थान टाइम्स‘ने याबाबत वृत्त दिले आहे.
दरम्यान, पाकड्यांचा हा गोळीबार म्हणजे घुसखोरीचा प्रयत्न लपवण्यासाठी केलेली कृती असावी, असा संशय लष्कराला आहे. त्यामुळे घनदाट जंगल परिसरात सध्या शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. यासह या भागात जवानांची अतिरिक्त कुमक तैनात करण्यात आली आहे.
दहशतवाद्यांशी लढताना जखमी झालेला जवान शहीद; किश्तवाडमध्ये सुरू आहे दहशतवाद्यांचा शोध


























































