जिथून तिकीट काढणार तिथूनच प्रवास करावा लागणार! रेल्वेच्या नियमांमध्ये होणार मोठा बदल

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वेने प्रवास करताना अनेकवेळा तिकीट काढून वेळेवर स्टेशनवर न पोहोचल्यामुळे ट्रेन सुटने, तिकीट न मिळने, तिकीट काढूनही वेटिंगवर असने अशा अनेक समस्यांचा सामना प्रवाशांना करावा लागतो. बऱ्याच वेळा तिकीट काढूनही प्रवाशी ट्रेनने प्रवास करत नाही, अशावेळी इतर प्रवाशांचा जागेसाठी वाद होताना पाहायला मिळतो. मात्र, आता रेल्वे या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. तुम्ही जर ट्रेनने प्रवास करत असाल तर तुम्ही ज्या स्थानकावरून तिकीट काढलं आहे, त्याच स्थानकावरून तुम्हाला तुमचा प्रवास सुरू करावा लागणार आहे. अन्यथा तुमची सीट इतर वेटिंगवर असणाऱ्या प्रवाशाला देण्यात येणार आहे.

रेल्वे मंत्रालयाने या नवीन व्यवस्थेला लागू करण्यासाठी आणि सॉफ्टवेअरमध्ये आवश्यक ते बदल करण्याचे निर्देश दिले आहेत. रेल्वेच्या या नवीन बदलाचा सर्वाधिक फायदा वेटिंगवर असणाऱ्या प्रवाशांना होणार आहे. कारण जर एखाद्या व्यक्तीने तिकीट काढली आणि तो व्यक्ती निर्धारित स्टेशनवर ट्रेनमध्ये बसला नाही. तर संबंधित व्यक्तीची ती जागा खाली मानली जाईल आणि वेटिंगवर असणाऱ्या इतर प्रवाशाला देण्यात येईल. तसेच वेटिंगवर असणाऱ्या प्रवशाला तात्काळ कन्फर्मेशन मिळेल.

तसेच, ज्या प्रवाशांना तिकीट काढलेल्या स्थानकावरून प्रवास करायचा नसेल, तर अशा प्रवाशांनी 24 तास आधी बोर्डिंग स्टेशनमध्ये बदल करणं आणि सिस्टीममध्ये तशी अपडेट करणं गरजेचं आहे. अन्यथा संबंधित जागा खाली मानली जाईल आणि वेटिंगवर असणाऱ्या प्रवाशाला देण्यात येईल. सदर सिस्टम अपडेट झाल्यानंतर देशभरातील सर्व लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये या नवीन नियमाची अंमलबजावणी केली जाणार आहे.