
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
विविध आधुनिक उपाययोजना राबवूनही रेल्वे अपघातांची संख्या कमी होत नसल्याने रेल्वे प्रशासनाने आता ट्रेनच्या इंजिनात ब्लॅक बॉक्स बसविण्याचा निर्णय घेतला आहे. इंजिनात बसवलेल्या लोको कॅब व्हॉईस रेकॉर्डरमुळे ( एलव्हीसीआर ) अपघाताच्या कारणांची नोंद करता येणार आहे. शिवाय या व्हॉइस अथवा व्हिडीओ रेकॉर्डिंग यंत्रणेमुळे प्रवासातील कर्मचाऱ्यांच्या कामगिरीचे मूल्यमापनही करता येईल अशी माहिती रेल्वे मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली. ब्लॅक बॉक्स विशेषतः विमानात वापरला जातो. त्याच्यातीळ नोंदीमुळे अपघातातातील मानवी चुकांचे अचूक निदान करता येते. या नव्या प्रणालीमुळे रेल्वे अपघाताची समीक्षा करून ते टाळता येण्यासाठीच्या उपाययोजना करता येतील असेही रेल्वे खात्याने स्पष्ट केले.

























































