2019मध्ये एकाही प्रवाशाचा अपघातात मृत्यू नाही! रेल्वेमंत्र्यांचा असाही एक दावा

323
railway-zero-accident

दरवर्षी रेल्वेच्या अपघातात प्रवासी मृत्युमुखी पडतात. पण 2019 या वर्षात रेल्वेच्या अपघातात एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नसल्याचा दावा रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी केला आहे. रेल्वेच्या 166 वर्षांच्या इतिहासात असे प्रथमच झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. म्हणजे हा रेल्वेचा एक प्रकारचा रेकॉर्डच म्हणावा लागेल.

रेल्वेमंत्री गोयल यांनी 2019 हे वर्ष झीरो पॅसेंजर डेथ वर्ष असल्याचे ट्विटरच्या माध्यमातून सांगितले आहे. सेफ्टी फर्स्ट… रेल्वेच्या 166 वर्षांच्या काळात प्रथमच ‘झीरो पॅसेंजर डेथ’ घडून आला आहे, अशा शब्दात त्यांनी आपले ट्विट केले आहे. पुढच्या ट्विटमध्ये ते म्हणतात, रेल्वे सेवा एकत्र झाल्यामुळे रेल्वेची कार्यशैली, सुविधा आणि निर्णय घेण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वपूर्ण बदल येणार आहेत. जागतिक स्तरावरील रेल्वे सेवा देण्यासाठी आमचे हे पहिले पाऊल असेल, असेही ते म्हणाले. वास्तविक याच महिन्यात 6 डिसेंबर रोजी दिल्ली उच्च न्यायालयाने देशभरातील सर्वच रेल्वे स्थानकांवरील सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारची आहे हे पाहण्यासाठी केंद्र सरकारकडून उत्तर मागविले होते. त्यावर भाष्य करताना रेल्वेमंत्र्यांनी ट्विटरच्या माध्यमातून हे उत्तर दिले आहे.

गेल्या वर्षात केवळ 59 अपघात

वर्ष 2017-18 या आर्थिक वर्षात 73 रेल्वे अपघात झाले होते, तर त्यानंतरच्या म्हणजे गेल्या वर्षात यात घट होऊन अपघातांची संख्या 59वर आली होती. मात्र या वर्षी 2019मध्ये हे प्रमाण चक्क 0.06 टक्क्यांवर आले आहे, असा दावा रेल्वे मंत्र्यांनी केला आहे. गेल्या 38 वर्षांत रेल्वेगाडय़ांची धडक, रेल्वेला आग लागणे, रेल्वे क्रॉसिंगवरील अपघात यात कमालीची घट झाली आहे, असेही त्यांचे म्हणणे आहे.

n मुंबईत दररोज किमान सहाजण रेल्वे अपघातात मृत्यूमुखी पडत असताना गेल्या वर्षभरात रेल्वे अपघातांमध्ये एकाही प्रवाशाचा मृत्यू झाला नाही या रेल्वेमंत्र्यांच्या दाव्यावर कसा विश्वास ठेवायचा, असा प्रश्न मुंबईकरांना पडला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या