
रेल्वे प्रवासात जेवणाची ऑर्डर दिल्यानंतर प्रत्यक्ष जेवण मिळवण्यासाठी बराच वेळ प्रतीक्षा करावी लागत असे. आता रेल्वेत झटपट जेवण मिळणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी इंडियन रेल्वे कॅटरिंग ऍण्ड टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) ‘फूड ऑन ट्रॅक’ ऍप सुरू केले आहे. त्याआधारे ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करून किंवा रोख रक्कम देऊन झटपट जेवण मिळणे शक्य होणार आहे.
रेल्वे प्रवास अधिक सुखकर करण्याच्या दृष्टीने आयआरसीटीसीने पावले उचलली आहेत. ‘फूड ऑन ट्रॅक’ ऍप हा त्याचाच एक भाग आहे. यापूर्वी आयआरसीटीसीने ई-कॅटरिंग सेवा कार्यान्वित केली होती. एसएमएस आणि कॉल सेंटरच्या माध्यमातून खाद्यपदार्थ मागवता येत होते. त्यापाठोपाठ आता ई-कॅटरिंग या आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावरून प्रवासी खाद्यपदार्थ मागवू शकतील. तसेच ‘फूड ऑन ट्रॅक’ मोबाईल ऍप आणि व्हॉट्सऍपच्या माध्यमातूनही खाद्यपदार्थ मागवण्याचा पर्याय प्रवाशांकडे असणार आहे. जेवणाची सुरक्षित आणि अचूक डिलिव्हरी करण्यासाठी ओटीपी आधारित प्रणाली राबवण्यात येणार आहे.





























































