लष्करी जवान रुपेश वीर यांचे अपघाती निधन

सामना प्रतिनिधी, ताडकळस

परभणी तालुक्यातील मिरखेल येथील मुळ रहिवाशी असलेले लष्कारी जवान रुपेश रावसाहेब वीर (२३) यांचे आज दुपारी नांदेड येथील जिल्हा रुग्णालयात निधन झाले. निधन झाले. मागील १३ जून रोजी त्यांचा पिंगळीच्या कॅनॉल पुलाजवळ अपघात झाला होता. त्यात ते गंभीर जखमी झाले होते. आज उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन बहिणी असा परिवार आहे.

जवान रुपेश वीर हे मिरखेल येथून परभणीकडे दुचाकी वाहनावरुन (एम.एच.२२ ए.जे. ८३२४) आपल्या चुलत भाऊ श्रीनिवास अशोकराव वीर यांच्यासोबत येत होते. पिंगळी जवळील कॅनॉलच्या पुलाजवळ समोरून येणाऱ्या भरधाव टिप्परने (क्र. एम.एच.२२ ११४५) त्यांना धडक दिली. यात रुपेश वीर गंभीर जखमी झाले, तर श्रीनिवास वीर हे किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यांची प्रकृती अधिकच गंभीर झाल्याने त्यांना त्वरीत नांदेड येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तीन दिवसाच्या उपचारानंतर शनिवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या अपघाती निधनामुळे मिरखेल गावावर शोककळा परसली असून परिसरातूनही हळहळ व्यक्त होत आहे.

२१ मे २०१५ रोजी लष्करात भरती झालेल्या रुपेश वीर यांची कौटुंबिक स्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची पाच एकर जमीन आहे. महिनाभराच्या सुट्टीसाठी ते गावाकडे आले होते. राजस्थान मधील अल्वर येथील लष्करी केंद्रात ते कार्यरत होते. रुपेश यांचे प्राथमिक शिक्षण मिरखेल येथे झाले असून त्यानंतर माध्यमिक शिक्षण मिरखेल स्टेशन येथील आंबोरे यांच्या संस्थेच्या शाळेत झाले होते. त्यांचे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण परभणी येथील संत तुकाराम महाविद्यालय येथे झाले होते. ते सध्या बी.कॉम. द्वितीय वर्षाला ते शिवाजी महाविद्यालयातून शिक्षण घेत होते.