पाटणचे जवान सचिन जाधव यांना लडाखमध्ये वीरमरण

पाटण तालुक्यातील दुसाळे गावचे सुपुत्र, वीर जवान सचिन संभाजी जाधव (वय 38) यांना बुधवारी (दि. 16) हिंदुस्थान -चीन सीमेवर लडाखमध्ये कर्तव्य बजावत असताना वीरमरण आले. त्यांच्या वीरमरणाची बातमी गावात पसरताच दुसाळे गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी दुसाळे या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शहीद जाधव यांच्या मागे आईवडील, पत्नी, मुलगा, मुलगी, आणि भाऊ असा परिवार आहे.

2002 साली ते सैन्यात भरती झाले. जम्मू-काश्मीर बरेली, पुणे, कांगो जम्मूमध्ये राष्ट्रीय रायफलमध्ये दोन वेळा होते गेले 19 वर्षात त्यानी विविध ठिकाणी सैन्यात काम केले होते सध्या ते 111 इंजिनीअरिंग रेजिमेंटमध्ये नाईक या पदावर कार्यरत हेते. सध्या चीनबरोबर हिंदुस्थानचा संघर्ष सुरु असलेल्या लेह-लडाख येथे ते कार्यरत होते. बुधवारी त्यांना वीरमरण आले.

लष्करी सेवेचा वारसा

जाधव यांच्या घराला लष्करी सेवेचा मोठा वारसा आहे. त्यांचे वडील संभाजी जाधव हे सुभेदार मेजर पदावरून निवृत्त झाले आहेत. तसेच त्यांचे भाऊदेखील देशसेवा बजावत आहेत. सचिन जाधव यांच्या पार्थिवावर मूळगावी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी कमांडर विजयकुमार पाटील (निवृत्त) यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या